। नवीन पनवेल । वार्ताहर ।
पाच कोटी रुपयांच्या सुपारी आणि मिरी चोरीप्रकरणी पनवेल शहर पोलिसांनी एकाला भिवंडी येथून ताब्यात घेतले. त्याला न्यायालयात हजर केले असता 30 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. कुणाल रमेश भानुशाली (मुंबई-कांदिवली) असे त्याचे नाव आहे.
23 डिसेंबर रोजी रात्रीच्या सुमारास शिरढोण येथील गाळ्यात कस्टम विभागाकडून कस्टम ड्युटी न भरलेला तीन कंपन्यांचा सुपारी व मिरी हा माल सुरक्षा रक्षक याला चाकूचा धाक दाखवून आणि त्याला बांधून चोरून नेला होता. त्यानंतर सुरक्षारक्षकाचा मोबाईल घेऊन ते पळून गेले. पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तांत्रिक तपासाद्वारे भिवंडी येथून कुणाल भानुशाली याला मुद्देमालासह ताब्यात घेतले. यातील मुख्य सूत्रधार अद्याप फरार आहेत. पुढील तपास पोलीस करत आहेत.