जीव गुदमरतोय, शेतीची हानी
| रसायनी | राकेश खराडे |
रसायनी पाताळगंगा येथील इसांबे ग्रामपंचायत हद्दीत येणारी रॉयल कार्बन ब्लॅक व फिंस्टर ब्लॅक प्रा.लि.विरोधात ग्रामस्थ मंडळ वयाळकरांनी जीवघेण्या कार्बनच्या प्रदूषण करणार्या कंपन्यांविरोधात गावबैठक घेत आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. या कंपन्यांमुळे आम्हा ग्रामस्थांचा आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला असून, यामुळे ग्रामस्थांत आजार बळावल्याचे स्थानिकांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
गावातील कार्बनच्या प्रदूषणामुळे अनेक महिने स्थानिक नागरिक त्रस्त असून, वेगवेगळ्या आरोग्याच्या असंख्य तक्रारी समोर येत असल्याने संतप्त ग्रामस्थांनी वयाळ गावातील मंदिरात गावबैठक आयोजित केली होती. यानंतर पत्रकार परिषदेत आपले मत व्यक्त केले. दरम्यान, कंपन्यांच्या चिमणीमधून हवेत मिसळलेले कार्बन मोठ्या प्रमाणात गावामध्ये पसरत असल्याने प्रदूषणाचा फटका वयाळसमवेत वानिवली, लोहोप, वाशिवली, टेंभरी व टेंभरीवाडी या गावांमधील लोकसंख्या जवळपास 17 ते 18 हजार असून, सर्व ग्रामस्थ प्रदूषणामुळे बाधित आहेत. अनेक वेळा तक्रारी करूनसुद्धा कंपन्यांकडून काहीही बदल न झाल्याने प्रदूषणावर कायमस्वरूपी उपाययोजना व्हावी अन्यथा अशा धोकादायक कारखान्यांना हद्दपार करावे, अशी मागणी ग्रामस्थांकडून जोर धरत आहे. या पत्रकार परिषदेत जनतेचा आक्रोश पाहता जोरदार घोषणा देत मोठा असंतोष पाहायला मिळाला. लहानथोरांनी यावेळी बैठकीत आपली खंत व्यक्त केली. भविष्यात या आंदोलनाची दिशा अधिक तीव्र स्वरूपाची करीत सर्व ग्रामस्थांनी संपूर्ण कुटुंबासह उपोषण आंदोलन करू, असा इशारा ग्रामपंचायत, तहसील, प्रदूषण कार्यालय, पर्यावरणमंत्री यांच्याकडे करण्यात आली असल्याचे वयाळ ग्रामस्थांनी सांगितले.
आरोग्य धोक्यात
या प्रदूषणामुळे श्वसनाचा त्रास मोठ्या प्रमाणात होत आहे. श्वास गुदमरणे, कोंढणे, खोकला उटणे तसेच अस्वस्थता जाणवणे, अशा एक ना अनेक आजाराने नागरिक मोठ्या प्रमाणात त्रस्त आहेत. भविष्यामध्ये कॅन्सर, श्वासाचे, फुफ्फुसाचे आजारदेखील होण्याची शक्यता असल्याने स्थानिकांनी जगायचे कसे, असा प्रश्न निर्माण होत आहे.
शेती काळवंडतेय
गावातील शेतकरी त्यांचे पीक, पाणी, फळझाडे यांस गेली पाच ते सहा वर्षे मोहोराची लागण होत नाही, तसेच भाजीपाल्यावर गंभीर परिणाम होत आहे. अनेक वेळा तक्रारी व अर्ज सूचना करूनसुद्धा कंपन्यांनी आपली बेजबाबदार प्रक्रिया तशीच चालू ठेवत असल्याचे पहावयास मिळते. या दोन्ही कंपन्यांवर कोणत्याही प्रकारची कारवाई होत नसल्याने अशा धोकादायक कारखान्यांविरोधात स्थानिक नागरिक आंदोलन व उपोषणाच्या तयारीत असून, कंपनी हद्दपार करा, अशी मागणी जोर धरत आहे.