खासदार निधीतून ई वाहने खरेदी करणार; खा.श्रीरंग बारणे यांची घोषणा

। नेरळ । वार्ताहर ।
मावळ लोकसभा मतदारसंघातील कोणताही दिव्यांग हा त्याच्या शारीरिक अवयवामुळे कायमचा अपंग राहणार नाही याची काळजी घेतली जाईल आणि मागील पाच वर्षाप्रमाणे आगमी काळात दिव्यांग व्यक्तींची सेवा करण्याचे काम करण्यासाठी कटिबद्ध आहोत अशी ग्वाही खा. श्रीरंग बारणे यांनी दिली. तसेच दिव्यांग व्यक्तींसाठी सतत धावपळ करणार्‍या कार्यकर्त्यांना आपल्या खासदार निधीमधून ई-वाहने दिली जातील आणि त्यातील एक ई वाहन अपंग संस्थेचे अध्यक्ष समीर साळोखे यांना दिले जाईल अशी घोषणा बारणे यांनी या कार्यक्रमात केली.
केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय विभागातर्फे दिव्यांग व्यक्तींना देण्यात येणार्‍या सवलती, साहित्य यांची नावनोंदणी शिबिराचे उद्घाटन कर्जत येथील रॉयल गार्डन सभागृहात खा.श्रीरंग बारणे यांचे हस्ते झाले, त्यावेळी नगराध्यक्षा सुवर्णा जोशी, बाबू घारे, भालचंद्र जोशी, मयूर जोशी, प्रथमेश मोरे, मिलिंद विरले, योगेश दाभाडे, बजरंग दळवी, नगरसेवक विवेक दांडेकर, नगरसेविका प्राची डेरवनकर, संचीता पाटील, आदी व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी कर्जत आणि खालापूर तालुक्यातील 270 दिव्यांगांनी नावनोंदणी केली, तर ज्यांना आज कर्जत येथे नाव नोंदणी करता आली नाही, त्यांनी सोमवारी पनवेल उपजिल्हा रुग्णालयात उपस्थित राहावे असे आवाहन अपंग संघटनेचे अध्यक्ष समीर साळोखे यांनी केले आहे.

Exit mobile version