खासदार, आमदारांनी नारळ फोडूनही वर्षभर उमट्याचा गाळ तसाच

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
उमटे धरणाच्या गाळ उपसा करण्याच्या कामाचा मोठा गाजावाजा करीत रायगडचे खासदार सुनील तटकरे आणि अलिबागचे स्थानिक आमदार महेंद्र दळवी यांनी नारळ फोडून आपली हौस भागवून घेतली. मात्र वर्षभरानंतरही उमटे धरण गाळाने भरलेलेच आहे. त्यामुळे फक्त शायनिंग मारणार्‍या या दोन नेत्यांविरोधात तालुक्यातील जनतेच संताप व्यक्त केला जात आहे. सामाजिक कार्यकर्ते अ‍ॅड राकेश पाटील यांनी देखील सायबाला बारीक अक्षरे दिसत नाहीत त्यामुळे प्रशासनाला मोठया अक्षरातील निवेदन देत लक्ष वेधले आहे.

अलिबाग तालुक्यातील सुडकोलीपासून आक्षीपर्यंतच्या 63 गावांना उमटे धरणातून पाणीपुरवठा केला जातो. जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या अखत्यारीत येणार्‍या उमटे धरणातील पाण्यावर सुमारे 45 हजार नागरिक अवलंबून आहेत. पाण्याने तळ गाठल्याने धरणातून गेल्या काही दिवसांपासून दूषित पाणी येत आहेत. धरणातील गाळ न काढल्याने दर वर्षी पाण्यासाठी परिसरातील नागरिकांना वणवण करावी लागत आहे. सद्यस्थितीत धरणामध्ये फक्त 12 टक्के जलसाठा शिल्लक आहे. त्यामुळे दिवसाआड पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे.

धरणामध्ये जलसाठा कमी झाल्याने मातीमिश्रित, गढूळ पाणी पिण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून धरणातील गाळ काढण्यात आलेला नाही.
खर्चासाठी जलसंपदा विभागाची मदतउमटे धरणातील गाळ काढण्याचा खर्च जिल्हा परिषदेला परवडणारा नाही. त्यामुळे राज्य सरकारच्या जलसंपदा विभागाच्या मदतीने गतवर्षी मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात गाळ काढण्यास सुरुवात करण्यात आली होती. मात्र फक्त नारळ फोडून श्रेय लुटण्याच्या पलिकडे कसलेही सोयरसुतक नसलेल्या खासदार, आमदारांनी आपली हौस भागवून घेतली. गाळ उपसा पावसाळ्यापूर्वी किती महिने पुर्वी करायला हवा होता याचा काहीच विचार न झाल्याने पावसाने हजेरी लावताच जलसंपदा विभागाला आपला गाशा गुुंडाळावा लागला. त्यामुळे 5 टक्के देखील गाळ न काढता परत जावे लागले.

आता पुन्हा एकदा या धरणातून पाणी आटत चालले असल्याने होणारा पाणी पुरवठा गढूळ होत आहे. त्यामुळे या दोन नेत्यांवर तालुक्यातील संताप व्यक्त केला जात आहे.
धरणातील गाळ 2022 तरी काढण्यात येईल, अशी अपेक्षा होती; मात्र नवे वर्ष सुरू होऊन महिने झाले, तरी गाळ काढण्याचे काम सुरूच झालेले नाही. जलसंपदा विभागाची साधनसामुग्री अन्य ठिकाणी हलविण्यात आल्याने धरणातील गाळ काढण्यात आला नसल्याचे सांगण्यात येत आहे. गाळ न काढल्याने परिसरातील धरणातील पाणीसाठ्याची क्षमता कमी झाली आहे. परिणामी उन्हाळा सुरू होताच लगतच्या गावांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागते.

बारीक अक्षरात दिलेलं निवेदन कदाचित साहेबांना वाचतांना अवघड जात असेल म्हणून मोठ्या अक्षरात निवेदन देऊन एकदा उमटे धरणाचागाळ काढावा या साठी ठळक अक्षरात निवेदन दिले आहे. – अ‍ॅड. राकेश पाटील, सामाजिक कार्यकर्ते

Exit mobile version