काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांचे प्रतिपादन
| उरण | प्रतिनिधी |
लोकनेते दि. बा. पाटील यांच्या पावन भूमीतील जासई, चिरनेर आणि दिघोडे ग्रामपंचायतमधील निवडणुकीत इंडिया आघाडीने सत्ता मिळविली आहे. आगामी होणाऱ्या सर्व निवडणुका या इंडिया आघाडीच्या माध्यमातून लढविल्या, तर खासदार आणि आमदार हे नक्कीच निवडणुन येतील, असे प्रतिपादन काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांनी केले. जासई ग्रामपंचायत सरपंच संतोष घरत व उपसरपंच माही पाटील यांच्या पद्ग्रहण सोहळ्या प्रसंगी ते बोलत होते.
सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी नवनिर्वाचित सरपंच व उपसरपंच यांचे अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. जासई ग्रामपंचायतीमध्ये थेट सरपंच म्हणून संतोष घरत, चिरनेरमध्ये भास्कर मोकल, दिघोडेमध्ये किर्तीनाथ ठाकूर हे निवडून आले होते. तर उपसरपंच पदासाठी जासईमधून माही पाटील, चिरनेरमध्ये सचिन घबाडी तर दिघोडेमधून अभिजित ठाकूर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या नवनिर्वाचित सरपंच व उपसरपंच यांचे माजी आमदार मनोहर भोईर, माजी आमदार बाळाराम पाटील, माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांच्यासह प्रदेश सदस्य डॉ. मनीष पाटील, मच्छिमार सेलचे प्रदेशाध्यक्ष मार्तंड नाखवा, माजी सभापती नरेश घरत, जिल्हा उपाध्यक्ष मिलिंद पाडगावकर, अकलाक शिलोत्री, तालुकाध्यक्ष विनोद म्हात्रे, तालुका प्रमुख संतोष ठाकूर, शेकापचे सुरेश पाटील आदींनी अभिनंदन केले.
महाविकास आघाडीच्या माध्यमातून आगामी होऊ घातलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपालिका निवडणुकीसह खासदार आमदार ही महाविकास आघाडीचा निवडून येऊ शकतात. यासाठी आपण सर्वांनी अक राहु या असे इंडिया आघाडीच्या नेत्यांसह जनतेला केले. ज्याप्रमाणे पूर्वी एकत्रितपणे कंपनीत धडक देऊन नोकरभरती करीत होतो, तोच फॉर्म्युला वापरला तर नक्कीच नोकरभरती करणे शक्य होईल. यासाठी आतापसूनच मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात करू या असेही ते म्हणाले.
या सोहळ्यासाठी धर्माशेठ पाटील, तात्या, रवी घरत, माणिक म्हात्रे, रमाकांत म्हात्रे, बाबुराव पाटील, मुरलीधर ठाकूर, संजय ठाकूर, यशवंत घरत, रघुनाथ म्हात्रे आदींसह महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी यापुढील सर्व निवडणुका महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढण्याचा निर्धार करण्यात आला.