| पाली/गोमाशी | प्रतिनिधी |
पुणे क्रीडा आयुक्तालय अंतर्गत मुंबई विभागीय शालेय कबड्डी स्पर्धाचे आयोजन पालघर येथे करण्यात आले होते. या स्पर्धेत मुंबई विभागातील एकूण 16 संघांनी सहभाग घेतला होता. 17 वर्षीय वयोगटातील अंतिम लढत रायगड विरुद्ध उल्हासनगर या संघात झाली. या स्पर्धेत ग. बा. वडेर हायस्कुल व व.ग.ओसवाल कनिष्ठ महाविद्यालय पाली रायगड या संघाने 17 वर्षीय वयोगटात गटात प्रथम क्रमांक पटकावला. या स्पर्धेतील द्वितीय क्रमांकाचा मानकरी उल्हासनगर महानगरपालिका ठरला. पालघर संघाला तृतीय तर नवी मुंबई संघाला चतुर्थ क्रमांकावर समाधान मानावे लागले. या स्पर्धेत रायगडच्या विद्यार्थ्यांनी आपला बहारदार खेळ करत विभागीय स्तरावर विजयला गवसणी घातली. ग.बा. वडेर हाय. व व.ग.ओसवाल कनिष्ठ महाविद्यालय पाली रायगड संघाचे प्रशिक्षक राकेश बेलोसे, अविनाश चिमटे यांनी मोलाचे मार्गदर्शन करून आपल्या संघास अंतिम दावेदार बनविले. या विजयाबद्दल संस्थेच्या कार्यवाह गीता पालरेचा, सचिव रविकांत घोसाळकर, मुख्याध्यापक भाऊसाहेब घोडके, उपप्राचार्य भिकन माळी यांनी अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.