250 ते 300 परदेशी भक्तांनी घेतले दर्शन
| पाली/बेणसे | प्रतिनिधी |
अष्टविनायक तीर्थक्षेत्र असलेल्या पालीतील बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही थायलंड येथील गणेशभक्तांचा उत्साह ओसंडून वाहात आहे. अनंत चतुर्दशीच्या सांगतेनंतर दरवर्षी मुंबईतील गणेशोत्सव अनुभवून पालीमध्ये येणाऱ्या या परदेशी भक्तांची बल्लाळेश्वर चरणी असलेली अथांग भक्ती संपूर्ण परिसरात कौतुकाचा विषय ठरत आहे.
मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या या प्रवासात तब्बल 250 ते 300 थायलंडवासियांनी बल्लाळेश्वराचे भाविकतेने दर्शन घेतले असून, सोमवारी (दि. 28) देखील थाई भाविकांचा मोठा समूह पालीत दाखल झाला. परदेशातून आलेल्या या गणेश भक्तांशी संवाद साधताना भाषेचा अडसर पूर्णपणे दूर झाला तो स्थानिक व्यावसायिक मनोज मोरे यांच्यामुळे. मनोज मोरे यांनी थायलंडच्या भक्तांशी थेट त्यांच्या मातृभाषेत म्हणजेच ‘थाई’ भाषेत अस्खलितपणे साधलेला संवाद पाहून उपस्थित सर्वच स्थानिक व भाविक अचंबित झाले.
थायलंड येथील मास्टर बेस्ट या ग्रुपच्या माध्यमातून दरवर्षी शेकडो गणेशभक्त भारताच्या दौऱ्यावर येतात. या परदेशी पाहुण्यांना येथील धार्मिक परंपरा, बल्लाळेश्वराचे महात्म्य आणि स्थानिक संस्कृती मनोज मोरे अत्यंत सोप्या भाषेत समजावून सांगत आहेत. आपल्याच भाषेत मार्गदर्शन मिळत असल्याने थायलंडचे भाविक अत्यंत आनंदी आणि भारावून गेले आहेत. मनोज मोरे यांच्या या संवादाचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून, त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. या सांस्कृतिक देवाणघेवाणीतून दोन्ही देशांतील धार्मिक व आंतरराष्ट्रीय पर्यटनाला मोठी उभारी मिळत आहे.







