करण, आदित्यची शतकी खेळी
। रायगड । क्रीडा प्रतिनिधी ।
झुंझार युवक मंडळ पोयनाड आयोजित व रायगड जिल्हा क्रिकेट असो.च्या मान्यतेने पै. अन्वर बुराण स्मृतीचषक चौदा वर्षाखालील मुलांच्या एकदिवसीय 40 षटकांच्या लेदर बॉल क्रिकेट स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेत बी.पी पाटील क्रिकेट अकॅडमी खारघर संघाने अलिबाग क्रिकेट अकॅडमी किहीम संघावर 257 धावांनी विजय मिळवला आहे. त्यामध्ये करण कांबळे यांनी 111 व आदित्य यादव यांनी 110 धावांची झुंझार शतकी खेळी करत संघाला विजय मिळवून दिला.
नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या बी.पी पाटील क्रिकेट अकॅडमी खारघर संघाने 40 षटकांच्या समाप्ती नंतर 9 गडी गमावत 407 धावा फलकावर नोंदवल्या. त्यामध्ये सलामीवीर फलंदाज करण कांबळे व आदित्य यादव यांनी शतकी खेळी केली. तर, मधल्या फळीत अनिमेश दास यांनी 52 धावांचे योगदान दिले. अलिबागकडून स्पर्श घाडी यांनी 4 फलंदाज बाद केले. प्रतिउत्तरात अलिबाग संघाने 35.5 षटकांमध्ये सर्व गडी गमावत 150 धावांपर्यंत मजल मारली. त्यामध्ये युवराज म्हात्रे यांनी सर्वाधिक 29 धावा काढल्या. खारघर संघाकडून अथर्व पवार यांनी 5 तर श्रेयांक मुनी व करण कांबळे यांनी प्रत्येकी 2 फलंदाज बाद केले. सामनावीर म्हणून करण कांबळे, स्टार प्रतिस्पर्धी खेळाडू म्हणून स्पर्श घाडी, उत्कृष्ठ क्षेत्ररक्षक अथर्व पवार व युवराज म्हात्रे यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.







