। सुधागड/पाली । वृत्तसंस्था ।
सुधागड तालुक्यातील भेलीव येथील मृगगड हा ऐतिहासिक महत्वाचा किल्ला आहे. या किल्ल्यावर दुर्गवीर प्रतिष्ठानातर्फे नुकतीच फलक मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत किल्ल्यावर माहिती व दिशा दर्शक फलक लावण्यात आले. या फलकांमुळे दुर्गप्रेमी व पर्यटकांचे गडरोहन आता सुकर झाले आहे.
सद्यस्थितीत गडावरील जुने माहिती व दिशादर्शक फलक जे जीर्ण झाले होते ते पुन्हा नव्याने लावण्यात आले. यामध्ये गडाची पूर्ण माहिती असलेले फलक ज्यामध्ये गडाचा पूर्ण नकाशा व गडावरील वास्तू दर्शविलेला फलक लावण्यात आला. तसेच, गडाकडे जाणारे मार्ग दाखविणारे फलक लावण्यात आले. यामुळे गडावर आलेल्या प्रत्येक दुर्गप्रेमी व पर्यटकांना गडावरील माहिती मिळेल. शिवाय नव्याने आलेल्यांना गडावर कसे जावे व तिथे काय काय आहे हे सहज कळणार आहे. सर्व दुर्गवीरांनी अतिशय मेहनत घेऊन हे फलक लावले. लोखंडी खांब, पत्रे व चौकट, रंग, फलक आदी सर्व समान घेऊन गड गाठला व महत्वाच्या ठिकाणी हे फलक सुयोग्यरीत्या लावण्यात आले.
या मोहिमेस ‘आम्ही सहयाद्रीचे शिलेदार’ यांचाही सहभाग लाभला. या मोहिमेत अर्जुन दळवी, विठ्ठल केंबळे, प्रमोद डोंगरे, सिद्धांत शिंदे, प्रतीक सुर्वे, भूषण पाटील व पार्थ शिंदे हे दुर्गवीर सहभागी झाले होते.
सलग 12 वर्षे गड संवर्धनाचे कार्य सुरू दुर्गवीर प्रतिष्ठानातर्फे मागील 12 वर्षे जसे शक्य होईल तसे गडावरील अनेक कामे लोकसहभागातून व श्रमदानातून आजवर करण्यात आली आहेत. गडावरील अंदाजे 12 फूट खोल असे पाण्याचे टाके जे दगड, चिरे यांनी बुजले होते, ते अनेक वर्षे अनेक मोहिमा करून अखेर मोकळे करण्यात आले आहे. तसेच, काही दिवसांपूर्वी गडावर अरुंद घळ व अवघड कातळावर जिथे अनेक वेळा अपघात होतात तिथे वायर रोप लावून ती जागा सुरक्षित करण्यात आली आहे. याशिवाय अनेक स्वच्छता व संवर्धन मोहिमा राबवून ऐतिहासिक वास्तू सुरक्षित केल्या गेल्या आहेत, असे दुर्गवीर प्रतिष्ठानचे अध्यक्ष संतोष हासुरकर यांनी सांगितले.