तांबडी आदिवासीवाडीला महावितरणाच फटका

पेण | वार्ताहार |
पेणपासून पाच किलोमीटर अंतरावर असणार्‍या तांबडी आदिवासी वाडीला महावितरण कंपनीच्या बेजबाबदारपणाचा फटका बसला आहे. या आदिवासी बांधवांच्या वाडीवर 40 ते 50 महावितरण कंपनीचे मिटर असून एप्रिल महिन्यापासून आजपर्यत या आदिवासी वाडीला विजबिल पोहच झालेले नाहीत. तसेच महावितरण कंपनीचा कर्मचारी अगर ठेकेदार या ग्राहकांच्या मिटरची रिडींग घ्यायला पोहचत नाहीत. आज अचानक सकाळी महावितरण कंपनीचे कर्मचारी या आदिवासी वाडीवर पोहचून संपुर्ण गावातील वीज पुरवठा खंडित केला.

याबाबत कोणतीही सूचना तांबडी ग्रामस्थांना दिली नाही. या गावात राहणारे आदिवासी बांधव हे हातावर कमवतात आणि पानावर खातात. रोजच्या रोज कामाला जातील तरच घरातील चूल पेटेल, अशी अवस्था आहे. तसच या गावात राहणारा ठाकूर समाज हा नियमात व कायदयाच्या चौकटीत राहणारा समाज आहे. बिल न आल्याने या गावाने बिल भरला नाही. महावितरण कंपनीची जबाबदारी आहे की ग्राहकांच्या मिटरची रिडींग घेणे व रिडींग प्रमाणे महिन्याच्या महिन्याला बिल देणे. परंतु अस न करता बेजबाबदारपणे पूर्ण गावाचा वीज पुरवठा खंडीत करून महावितरण कंपनीने बेजबाबदारपणाचा कहर केला.

गावातील वीज पुरवठा खंडीत होताच सोमा खाकर, जोमा खाकर, नाग्या कडू, नाग्या खाकर यांच्यासह तांबडी ग्रामस्थांनी सर्व व्यथा नगरसेवक शोमेर पेणकर यांना सांगितली. शोमेर पेणकर यांनी तातडीने सर्व ग्रामस्थांना घेऊन विद्युत महावितरण कंपनीचे कार्यालय गाठले व अधिक्षक अभियंता डी.आर.पाटील यांच्या बरोबर सदरील घटनेबाबत विचार विनिमय केला. झालेल्या प्रकाराबाबत महावितरण कंपनीकडून दिलगिरी व्यक्त करत त्यावर तातडीने निर्णय घेतला.

तीन महिने रिडींग घेतलेली नाही व बिले दिलेली नाहीत व त्यावर त्वरीत अधिकारी वर्गाना तांबडी येथे पाठवून प्रत्येक ग्राहकाचा तीन महिन्याचा बिल कीती आलाय हा रिडींग प्रमाणे काढण्यास सांगितले. तसेच आर्ध बिल भरून खंडीत केलेला विज पुरवठा पुर्ववत करण्यास सांगितले. पेण शाखेचे शाखा अभियंता उमाकांत सकपाळे यांनी देखील चार वाजण्याच्या आत सदरील गावाच्या सर्व समस्या सोडवून विज पुरवठा पूर्ववत केला जाईल, असे सांगितले.

बिल भरणे ही ग्राहकाची जबाबदारी असली तरी तो बिल ग्राहकांपर्यत पोहचवणे हे विद्युत महावितरण कंपनीचे कर्तव्य आहे. हे कर्तव्य पार न पाडता महावितरण कंपनी अशा प्रकारे मनमानी कारभार करत असेल तर आम्ही कधीच खपून घेणार नाहीत. त्यामुळे भविष्यात अशा प्रकारची चूक पुन्हा महावितरण कंपनीने केल्यास आम्ही शेतकरी कामगार पक्षाच्या पध्दतीने उत्तर दिल्याशिवाय राहणार नाहीत.
शोमेर पेणकर,नगरसेवक

Exit mobile version