घरावरुन गेलेली उच्च वीजदाब वाहिनी हटविण्याकडे दुर्लक्ष
। कोर्लई । वार्ताहर ।
मुरुडच्या दस्तुरी नाकाजवळ आयटीआयच्या मागील बाजूस राहत्या घरावरुन गेलेली महावितरणची जीर्ण झालेली उच्चदाब वीजवाहिनी व विजेचा खांब धोकादायक बनला आहे. वेळप्रसंगी जीवित व वित्तहानीची शक्यता लक्षात घेऊन तातडीने हटविण्याची मागणी निलोफर हमदुले यांनी पालकमंत्री अदिती तटकरे, रोहा, मुरुड येथील वीज अभियंता व नगरपरिषदेच्या माजी नगराध्यक्षा स्नेहा पाटील यांना एक निवेदन देण्यात येऊन करण्यात आली होती. या निवेदनाची दखल घेऊन पालकमंत्री अदिती तटकरे यांनी महावितरणच्या संबंधित अधिकार्यांना योग्य ती कार्यवाहीसाठी आदेश दिले होते. मात्र, अद्यापही महावितरणकडून कोणतीही कार्यवाही करण्यात न आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
मुरुडच्या दस्तुरी नाकाजवळ आयटीआयच्या मागील बाजूस निलोफर हमदुले यांचे राहते घर असून, जवळच महावितरणच्या उच्चदाब वीज वाहिनीचा असलेला खांब जीर्णावस्थेत आहे. या खांबावरील उच्चदाब वीज वाहिनी आवारातून घरावरून गेलेली असल्याने वेळप्रसंगी केव्हाही कोसळून जिवित व वित्त हानीची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे हा खांब तातडीने हटविणे गरजेचे आहे. याठिकाणी महावितरणने उच्च वीजदाब वाहिनी खांबाला वार्याची दिशा पाहता पश्चिम दिशेकडील खांबाला स्टे न देता घराजवळील खांबाला विरुद्ध दिशेने स्टे दिला आहे. यामुळे भविष्यात हा खांब घराकडे कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही. याला सर्वस्वी जबाबदार अधिकारी राहतील. मागील पावसाळ्यात येथे वीज वाहिनी पडली होती. परंतु, सुदैवाने वीजपुरवठा बंद असल्याने दुर्घटना टळली होती.
महावितरणच्या वरीष्ठ अधिकार्यांनी यात लक्ष पुरवून पावसाळ्यापूर्वी योग्य ती कार्यवाही करण्यात यावी अन्यथा पावसाळ्यात वेळप्रसंगी कोणती दुर्घटना घडली तर याला संबंधित अधिकारी सर्वस्वी जबाबदार राहतील, असे निलोफर हमदुले यांनी म्हटले आहे.







