। मुरुड । वार्ताहर ।
विविध संकटांमुळे सर्वसामान्यांची परिस्थिती गंभीर असताना सुद्धा महावितरण जबरदस्तीने वीज बिल वसुलीवर जोर देत आहेत. हे ताबडतोब बंद करा. दिवाळीत भाताचे पीक आल्यावर लोकांच्या हातात पैसे येणार आहे.तेव्हा थोडा धीर धरा लोक वीज बिलाचे सर्व पैसे भरतील यासाठी लोकांना मुभा देण्यात यावी अशी मागणी माजी आमदार पंडितशेठ पाटील यांनी केली आहे. रायगड जिल्ह्यात महावितरण वीज बिलासाठी सक्ती करीत असून लोकांचे कनेक्शन तोडण्याचा सपाटा लावला असून ही कृती थांबवावी,अशी मागणीही त्यांनी केली.
यंदा रायगड जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस पडला असून महाड, मुरुड, श्रीवर्धन, म्हसळा, कर्जत आदी तालुक्यात पावसाच्या पाण्यामुळे मोठे नुकसान झाले आहे. काही तालुक्यात पुराचे पाणी शिरून जीवनावष्य वस्तूंचे मोठे नुकसान सुद्धा झाले आहे.मग अश्या तालुक्यात सुद्धा वीज बिलाची सक्ती महावितरणने करणे योग्य नाही,याकडेही त्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले. यावेळी त्यांच्या समवेत मुरुड तालुका चिटणीस मनोज भगत,नगरसेवक आशिष दिवेकर,माजी सरपंच अजित कासार,बोर्ली सरपंच चेतन जावसेन,रमेश दिवेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
ज्या भागात पूर परिस्तिथी आहे तिथे वीज बिल भरण्याची सक्ती करण्यात येऊ नये असे आदेश वीज मंत्री नितीन राऊत यांनी देऊन सुद्धा याकडे मात्र महावितरण दुर्लक्ष करीत असून गरीब व मध्यम वर्गाला त्रास देऊन त्याचे कनेक्शन तोडत आहेत. मोठ्या कंपन्यांची प्रथम वीज बिल वसुली करा, मग मध्यमवर्गाची वसुली करा.
पंडित पाटील,माजी आमदार