। पोलादपूर । प्रतिनिधी ।
तालुक्यातील काही अधिकार्यांना बदली होत नसल्याने जनतेच्या जीवाशी खेळण्याची प्रचंड हौस असल्याचे दिसून येत असून, गेल्या तीन दिवसांमध्ये न्यू सातारामध्ये शॉर्टसर्किट झाल्यानंतर भैरवनाथनगरात विद्युतवाहक तार तुटून रस्त्यावर पडल्याच्या सलग दोन घटनांमुळे पोलादपूर महावितरणच्या ‘सूद’समवेत कारभाराची प्रचिती जनतेने घेतली आहे.
पोलादपूर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या न्यू सातारा पतसंस्थेच्या निवासी संकुलाच्या प्रवेशद्वाराजवळील विद्युत मीटरच्या जागी पॉवर सप्लाय केबलमधून होणार्या ठिणग्यांचा चित्तथरारक खेळ मंगळवार, दि. 24 मे रोजी सकाळी परिसरातील नागरिकांनी पाहिल्यानंतर प्रचंड घबराट पसरली होती. महावितरणकडून या न्यू सातारा निवासी संकुलाला स्वतंत्र डीपी बसविण्याचे कोटेशन देऊनही अचानक आधी तात्पुरती, मग रेग्युलर विद्युत मीटर मुभा देऊन ‘सूद’समवेत मेहेरबानी केली गेली.
यानंतर गुरूवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास भैरवनाथनगर येथील डीपी जवळून गेल्या आठवड्यांपासून ठिणग्या उडत असताना कोणत्याही जनमित्र अथवा महावितरणच्या कर्मचार्यांनी तसेच अधिकार्यांनी जाणूनबुजून सपशेल दुर्लक्ष केले. त्यामुळे ठिणग्या उडणार्या ठिकाणी असलेल्या विजेच्या खांबावरून विद्युतवाहक तार तुटून जमिनीवर पडल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले.
गेल्या आठवडाभरात पावसाळ्यापूर्वीची कामे या शीर्षकाखाली पोलादपूर तालुक्यात सकाळी 6 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत असा दोनवेळा विद्युतप्रवाह खंडित करण्याचा खेळ खेळला जाऊनही शहरात दोनठिकाणी झालेल्या शॉर्टसर्किटमुळे ग्राहकांच्या जीवाशी कोण खेळत आहे का, अशी साशंकता निर्माण झाली आहे.यानंतर महावितरणच्या अभियंता सुनील सूद यांच्याशी लोकांनी संपर्क केला असताना त्यांनी कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरील लाईनमनना पाठवून विद्युतवाहक तार पूर्ववत बसवून विद्युतप्रवाह सुरळीत केला. पोलादपूर शहरातील विविध क्षेत्रातील ग्राहकांना महावितरणसंदर्भात असलेल्या समस्या ऐकण्यासंदर्भात अभियंता सूद यांना किळस वाटत असून, त्यांची गेल्या पाच-सहा वर्षांपासून बदली न झाल्याने यावेळी निकाराचा प्रयत्न करून ग्राहकांना वेठीस धरताना दिसून येत आहेत. मात्र, महावितरणकडून अद्याप सूदसमवेत कारभारापासून पोलादपूरांची सुटका करण्यात आली नाही.