महावितरणच्या ‘सौर ऊर्जा’ प्रकल्पांची वाटचाल जोमात

। मुंबई । प्रतिनिधी ।
महावितरणच्या विकेंद्रीत सौर कृषी ऊर्जा प्रकल्पांची वाटचाल जोमात सुरु आहे. प्रकल्पांसाठी वाढत्या प्रतिसादामुळे शेतकर्‍यांना सिंचनासाठी दिवसा वीजपुरवठा करण्याचे स्वप्न साकार होऊ लागले आहे.
राज्य शासनाच्या मुख्यमंत्री सौर कृषिवाहिनी योजने अंतर्गत आतापर्यंत 1440 मेगावॅट क्षमतेचे करार करण्यात आले आहेत. तर राज्यभरात 108 सौर कृषिवाहिन्यांद्वारे सध्या 45 हजार 664 शेतकर्यांना दिवसा वीजपुरवठा सुरू करण्यात आला आहे.
राज्याचे ऊर्जामंत्री ना. डॉ. नितीन राऊत यांच्या संकल्पनेतील कृषिपंप वीज धोरण 2020 मध्ये कृषिपंपांना दिवसा वीजपुरवठा करण्यासाठी सौर कृषिवाहिनी योजनेअंतर्गत विकेंद्रीत सौर ऊर्जा प्रकल्प उभारणीसाठी महावितरण मार्फत विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत.
महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी सौर ऊर्जा प्रकल्पांना वेग देण्यावर अधिक भर दिला असून त्याप्रमाणे यंत्रणा देखील गतिमान झाली आहे. या योजनेमध्ये कृषी अतिभारीत उपकेंद्राच्या 5 किलोमीटरच्या परिघात 2 ते 10 (2ु5) मेगावॅट क्षमतेचे विकेंद्रीत सौर प्रकल्प कार्यान्वित करून संबंधित कृषिवाहिनीद्वारे कृषिपंपांना दिवसा वीजपुरवठा उपलब्ध करून देण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत जास्तीत जास्त विकेंद्रीत सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी महावितरणकडून सातत्याने निविदा काढण्यात येत आहेत.
आतापर्यंत राज्यातून सौर प्रकल्पांच्या जागांसाठी 1111 अर्जांद्वारे एकूण 16 हजार 49 एकर जागेचे प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. तांत्रिक पाहणीमध्ये यामधील 4 हजार 8 एकर जमिन सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यास तांत्रिकदृष्ट्या योग्य असल्याचे दिसून आले आहे.
उर्वरित जागांची पाहणी करण्यात येत असून अर्ज मंजूरीची प्रक्रिया देखील युद्धपातळीवर राबविण्यात येत आहे. नापीक व पडीक जमिनी भाडे पट्टीवर देण्यासाठी जमिन धारकांनी नजीकच्या कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

Exit mobile version