लालपरी ब्रेकडाऊन

जिल्ह्यातील आठही डेपो कडक बंद
प्रवाशांचे हाल, संपाला शेकापचा पाठिंबा
अलिबाग । शहर प्रतिनिधी ।
एसटीचे राज्य शासनात विलिनीकरण या प्रमुख मागणीसाठी एसटी कर्मचार्‍यांनी पुकारलेल्या बेमुदत संपाला रायगडात सोमवारी उदंड प्रतिसाद लाभला. जिल्ह्याची जीवनवाहिनी म्हणून ओळखली जाणारी लालपरी आठही डेपोमध्ये बंद ठेवण्यात आली होती. त्यामुळे प्रवाशांचे मोठे हाल झाले. कर्मचार्‍यांच्या या संपाला शेकापने जाहीर पाठिंबा दिला असून, सरकारने याबाबत तातडीने तोडगा काढून कर्मचार्‍यांच्या मगाण्या मान्य कराव्यात, असे आवाहन शेकाप सरचिटणीस आ. जयंत पाटील यांनी केले आहे.
एसटी कर्मचार्‍यांना सरकारी सेवेत सामावून घ्यावे, या प्रमुख मागणीबाबत महाराष्ट्र राज्य एसटी कर्मचारी संघटनेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. यापूर्वी प्रलंबित मागण्या मान्य न झाल्याने एसटी कर्मचार्‍यांनी उपोषण करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर दिवाळीच्या सणात प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून कर्मचार्‍यांनी तात्पुरता संप मागे घेतला होता. परंतु, पुन्हा एसटी कर्मचारी आक्रमक झाले आहेत. सोमवारी (दि.2) रायगड जिल्ह्यातील आठही डेपोत बंद पाळला गेला. या संपामध्ये सुमारे 3100-3200 कर्मचार्‍यांचा सहभाग असल्याचे वाहतूक नियंत्रक प्रसन्ना पाटील यांनी सांगितले.
राज्यातील 250 एसटी डेपोंपैकी 160 डेपो सध्या बंद आहेत. सोमवारी राज्यातील आणखी काही डेपोतील एसटी कर्मचारी या संपामध्ये सहभागी झाले आहेत. त्यामुळे एसटी कर्मचार्‍यांचा संप आणखी चिघळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या संपामुळे दिवाळी संपवून गावाकडून घरी परतणार्‍या प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. एसटी डेपोमध्ये प्रवाशांची गर्दी झालेय; पण एकही एसटी डेपोतून बाहेर पडत नसल्याने प्रवाशांना ताटकळत बसावे लागले.

जोपर्यंत आम्हा एसटी कर्मचार्‍यांची विलिनीकरणाची मागणी पूर्ण होत नाही व तसा लेखी जीआर मिळत नाही, तोपर्यंत संप मागे घेणार नाही. जिल्ह्यातील आठही डेपो बंद असून, एकही गाडी निघालेली नाही. आम्ही विलिनीकरणाच्या मागणीसाठी हा संप केला आहे.
प्रसन्ना पाटील, वाहतूक नियंत्रक

कर्जत आगारातील कामगार संपावर
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण करण्यात यावे आणि कामगारांचे थकीत वेतन, भत्ते, सवलती त्वरित लागू कराव्यात या मागणीसाठी सोमवारी (दि. 7) कर्जत एसटी आगारातून एकही एसटी गाडी धावली नाही. कर्जत आगारातील सर्व चार कामगार संघटना यांनी संपावर जाण्याचा निर्णय घेतल्याने तेथे करणारे सर्व 93 कामगार संपामध्ये सहभागी झाले आहेत. दरम्यान,कर्जत आगारातून एकही एसटी गाडी कोणत्याही भागासाठी रवाना होऊ शकली नाही.

मुरुडमध्ये एसटी कर्मचार्‍यांचा शंभर टक्के बंद
राज्य परिवहन महामंडळाचे शासनात विलिनीकरण करून शासन नियमाप्रमाणे सर्व सोयी सवलती व वेतन लागू करण्यात यावे. या मागणीसाठी राज्यासह मुरुड आगारातील कर्मचार्‍यांनी आमदार गोपिचंद पडळकर, महाराष्ट्र राज्य कनिष्ठ वेतनश्रेणी एसटी कर्मचारी संघटनेचे अजयकुमार गुजर यांनी राज्यव्यापी एसटी राज्यशासनात विलिनीकरण करण्यासाठी संपाच्या नोटीस नुसार रविवारी (दि.7) मध्यरात्री पासून बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले. बंद शंभर टक्के करण्यात आल्याने सोमवारी मुंबई, पुणे व अन्यत्र जाणार्‍या तसेच आरक्षण केलेल्या प्रवासी वर्गाचा खोळंबा होऊन त्रास सहन करावा लागला.

Exit mobile version