। अलिबाग । प्रतिनिधी ।
राज्याप्रमाणे वेतन मिळावे यासह अनेक मागण्यांसाठी एसटी कर्मचार्यांनी मंगळवारपासून (दि. 3) संप पुकारला आहे. महाराष्ट्र एसटी संयुक्त कृती समितीच्या वतीने हा संप सुरु करण्यात आला आहे. या संपाला रायगड जिल्ह्यातून अल्प प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र दिसून आले आहे. संपामुळे जिल्ह्यातील काही आगारातील फेर्या बंद झाल्याने ऐन गणेशोत्सवात प्रवाशांचे हाल झाल्याची माहिती समोर येत आहे.
एसटी कर्मचारी गेल्या अनेक महिन्यांपासून त्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी लढा देत आहेत. वारंवार वरिष्ठ पातळीवर बैठका घेण्यात आल्या. परंतु, प्रत्यक्षात अंमलबजावणी झाली नसल्याने महाराष्ट्र एसटी संयुक्त कृती समितीच्या वतीने संपाची हाक देण्यात आली. ऐन गणेशोत्सवाच्या हंगामात कर्मचार्यांच्या संपाचा फटका जिल्ह्यातील काही प्रवाशांना बसला. जिल्ह्यात या संपाला 40 टक्के प्रतिसाद मिळाला असल्याची माहिती समोर येत आहे. जिल्ह्यातील अलिबागसह अनेक आगारांतील एसटी बस फेर्या कर्मचार्यांविना बंद करण्याची वेळ प्रशासनावर आली. गणेशोत्सवामध्ये मुंबईतून गावी येणारे व गावावरून मुंबई, पुण्याकडे जाणार्या प्रवाशांची संख्या अधिक आहे. गेल्या अनेक दिवसांपासून एसटीतून प्रवास करणार्यांची संख्या वाढली आहे. परंतु, कर्मचार्यांच्या संपामुळे काही फेर्या रद्द कराव्या लागल्याची माहिती विभागीय कार्यालयाकडून देण्यात आली.