पाली बस स्थानकात चिखलाचे साम्राज्य

संबंधित विभागाचे दुर्लक्ष

। सुधागड-पाली । वार्ताहर ।

कोरोनाच्या संसर्गामुळे बर्‍याच प्रमाणात लाल परीच्या फेर्‍या कमी झाल्याने पाली बसस्थानकामध्ये सर्व सामान्यांची वर्दळ देखील कमी झालेली आहे. सततच्या पावसाने पाली एसटी बसस्थानकाची दुरवस्था झाली असून, स्थानकाच्या आवारात डबकी साचून सर्वत्र चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे पाली बसस्थानक पाण्यात हरवले की काय असा प्रश्‍न प्रवाशांना पडला आहे.

सुधागड तालुक्यातील मध्यवर्ती ठिकाणी पालीचे एसटी बसस्थानक असून या स्थानकात प्रवाशी व विद्यार्थ्यांची मोठी वर्दळ असते. मात्र कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर आता ती कमी झाल्याचे पहायला मिळत आहे. त्यामुळेच या बसस्थानकाकडे दुर्लक्ष होत आहे. या बसस्थानकात साचणार्‍या पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी योग्य ती व्यवस्था नसल्याने स्थानकात सतत पावसाचे पाणी साचते. गेल्या अनेक वर्षापासून ही समस्या येथे असून त्याबाबत कोणतीही ठोस उपाययोजना आजपर्यंत करण्यात आली नसल्याने दरवर्षी ही परिस्थिती उद्भवते. स्थानकात पडलेेल्या लहान मोठ्या खड्ड्यात पाणी साचून डबकी तयार झाली असून संपूर्ण स्थानकाच्या परिसरात चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे येथील प्रवाशांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

बसस्थानकामध्ये जागोजागी चिखल झाल्याने बस स्थानकात येणार्‍या प्रवासी तसेच नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. लवकरात लवक उपाययोजना करण्यात यावी.

-प्रकाश पालकर, कार्याध्यक्ष, सुधागड वंचित सामाजिक विकास संस्था.

Exit mobile version