| उरण | प्रतिनिधी |
अटल सेतू ते दिघोडे फाटा या कोकणात जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर मोठ मोठे खड्डे पडल्याने त्याचा नागरिक, पर्यटक, विद्यार्थी, रुग्णांना त्रास होत आहे. रस्त्यावरील खड्डे त्वरित बुजवावेत व लवकरात लवकर सदर रस्त्याचे रुंदीकरण करून काँक्रिटीकरण करावे, या मागणीसाठी दिघोडे गावातील संतप्त नागरिकांनी शुक्रवारी (दि. 25) चक्क दिघोडे फाट्यावरील चिखलात रुतलेल्या खड्ड्यांमध्ये बसून आंदोलन केले. या आंदोलनात सरपंच किर्तीनिधी ठाकूर, महिला, प्रवासी नागरिक उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते.
आंदोलनकर्त्यांनी जवळजवळ दीड तास चिखलातील खड्ड्यात बसून जनहितार्थ आंदोलन छेडल्याने रस्त्यावर मुंबई व कोकणाच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांची रांग लागली होती. आंदोलनाची दखल सार्वजनिक बांधकाम विभाग उरणचे उपअभियंता नरेश पवार, उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र मिसाळ यांनी दिघोडे गावचे सरपंच किर्तीनिधी ठाकूर यांना सदर रस्ता खड्डे मुक्त करण्यासाठी तसेच वाहतूक कोंडीवर उपाययोजना करण्यासाठी पुढाकार घेतला जाईल, असे लेखी पत्र दिल्याने तूर्त आंदोलन स्थगित केल्याचे सरपंच किर्तीनिधी ठाकूर यांनी सांगून सदर आंदोलनात उत्स्फूर्तपणे सहभागी झालेल्या दिघोडे गावातील ग्रामस्थ, प्रवासी नागरिकांचे महिलांचे आभार व्यक्त केले. यावेळी सदर रस्त्याचे काम घेणाऱ्या में पी पी खारपाटील कंपनीने रस्त्यावरील खड्डे बुजवण्यास सुरुवात केली आहे.
या आंदोलनात दिघोडे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच अविनाश पाटील, वर्षकेतू ठाकूर, सरपंच किर्तीनीधी ठाकूर, उपसरपंच संदेश पाटील, काँग्रेसचे नेते रामनाथ पंडित, प्रेमनाथ म्हात्रे, माजी सरपंच संकीता संदिप जोशी तसेच परिसरातील प्रवासी नागरिक सहभागी झाले होते.






