खडकांवरही लालसर रंगाचे थर; गाळाची तपासणी करण्याची मागणी
| नेरळ | प्रतिनिधी |
खंडाळा बोर घाटात उगम पावणारी उल्हास नदी मागील काही दिवसांच्या गढूळ पाण्यामुळे चर्चेत आली होती. या गढूळ पाण्याबद्दल उल्हास नद्या बचाव समितीच्या वतीने अभ्यास सुरू केला आहे. या गढूळ पाणी प्रकरणाची वैज्ञानिक तपासणी करण्याची मागणी केली आहे. दरम्यान उल्हास नदी बचाव समितीच्या वतीने संपूर्ण उल्हास नदी परिसराची पाहणी केल्यावर ही मागणी केली आहे.
सप्टेंबर महिन्याचे अखेरीस फारसा पाऊस झालेला नसताना उल्हास नदीचे पाणी गढूळ झाले होते. त्यानंतर उल्हास नदी बचाव समितीचे वतीने नदीचे उगम स्थान पासून कोंढाणे लेणी परिसर, पेज नदीकाठ, टॉरंट पॉवर प्लांट परिसर, सावरगाव रेल्वे यार्ड तसेच वावे, वांजळे, बेंडसे, दहीवली, आवळस, नेवाळी, कोल्हारे, धामोते, शेलू, बांधिवली आणि खारवडी आदी भागांचीही पाहणी करण्यात आली. चिल्हार, उल्हास आणि पेज नदीच्या विविध ठिकाणांहून पाण्याचे नमुने घेऊन त्यांची तुलनात्मक तपासणी करावी. तसेच नदीतील लालसर गाळ, नदीकाठची माती आणि उत्खननातील माती यांचेही वैज्ञानिक परीक्षण करावे, अशी मागणी केली आहे.
या पाहणी दरम्यान डोंगरकटिंग, मोठ्या प्रमाणातील वृक्षतोड, मातीचे विस्थापन, नदीकाठावरील बांधकामे आणि नदीत वाहून येणारा गाळ आढळून आला. विशेषतः कर्जतजवळील पिंपळोळी परिसरातील चिल्हार नदीकाठावर सुमारे 180 एकर क्षेत्रातील प्लॉटिंग प्रकल्पाच्या परिसरात मोठ्या प्रमाणात डोंगरकटिंग आणि वृक्षतोड झाल्याचे पाहणीत दिसून आले आहे. या भागातील डोंगराचा नैसर्गिक उतार बदलल्याने काही ठिकाणी माती घसरणे आणि भूस्खलनासारखी परिस्थिती दिसून आली. मुसळधार पावसात ही लालसर माती व गाळ चिल्हार नदीत आणि पुढे उल्हास नदीत वाहून येत आहे का, हा आता तपासाचा महत्त्वाचा मुद्दा आहे.
विशेष म्हणजे चिल्हार नदीच्या पाण्यासोबत नदीतील दगड आणि खडकांवरही लालसर थर आढळल्याचे समितीने सांगितले. त्यामुळे हा नैसर्गिक गाळाचा परिणाम आहे की अन्य कारणामुळे पाण्याचा रंग बदलला आहे, याची वैज्ञानिक तपासणी आवश्यक आहे. या ठिकाणी सुरू असलेल्या विविध बांधकामांमधून माती अथवा गाळ नदीत मिसळतो आहे का, याची तपासणी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
कर्जत तालुक्यात सुरू असलेल्या भागाची वैज्ञानिक तपासणीची मागणी केली आहे. त्या पाहणीत पिंपळोळी परिसरातील डोंगरकटिंग आणि मातीचे विस्थापन हे लालसर गाळाच्या संभाव्य स्रोतांपैकी एक असल्याचे समितीने म्हटले आहे. मात्र, वैज्ञानिक जलनमुना तपासणी शिवाय कोणत्याही एका प्रकल्पाला दोषी ठरविणे योग्य नसल्याचेही समितीने स्पष्ट केले. हा पाहणी दौरा दिलीप कपोते फाऊंडेशनच्या डॉ. कल्पना (राणी) कपोते यांच्या पुढाकाराने शशिकांत दायमा यांच्या सहकार्याने झाला. यावेळी रविंद्र लिंगायत, अशफाक शेख, प्रशांत राऊत, हरेश सोनावळे, मोहन भागवत, तसेच उल्हास नदी बचाव कृती समितीचे सदस्य उपस्थित होते. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, महसूल, वन, जलसंपदा विभाग, स्थानिक प्रशासन तसेच संबंधित प्रकल्प आणि रेल्वे प्रशासनाने संयुक्त पाहणी करून डोंगरकटिंग, वृक्षतोड, नदीकाठावरील बांधकामे आणि माती व्यवस्थापना संदर्भातील परवानग्यांची तपासणी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
वैज्ञानिक पुरावा शोधण्याची मागणी
उल्हास नदी लाल का झाली? स्रोत शोधल्याशिवाय प्रश्न संपणार नाही आणि वैज्ञानिक पुरावा समोर येईपर्यंत शोध थांबणार नाही, अशी भूमिका उल्हास नदी बचाव कृती समितीने घेतली आहे.
