गुरूकुल शिक्षण संस्थेची मुजोरी

शिक्षण विभागाच्या नोटीसीला केराची टोपली
। पेण । प्रतिनिधी ।
पेण पंचायत समितीच्या शिक्षण विभागाकडून गटशिक्षण अधिकारी अरूणादेवी मोरे यांनी 11 जुलै 2022 रोजी पी.एस.एम.एस. इंग्लिश मिडियम स्कूल, पेण (गुरूकुल) च्या मुख्याध्यापिका प्रीती बराटे यांना नोटीसीद्वारे कळविले होते की, आपल्या संस्थेत लिड शिक्षण प्रणाली सुरू केली असून, ती शासनाची कोणतेही परवानगी न घेता सुरू केली आहे. त्या बदल्यात पालकांकडून 3600/- रू अतिरिक्त शुल्क आकारले आहे. ही शिक्षण पद्धती तात्काळ बंद करण्याचे आदेश गटशिक्षणाधिकार्‍या दिले आहे. परंतु, त्या आदेशाला केराची टोपली दाखविण्याचे काम संस्थेकडून सुरु आहे.

लिड शिक्षण प्रणाली ही शासनाच्या अभ्यासक्रमावर आधारित नाही, ती त्वरित बंद करावी आणि राज्य शासनाचा मान्यता प्राप्त असलेलाच अभ्यासक्रम आपल्या संस्थेत शिकविणे अपेक्षित आहे, अशी वारंवार पालकांची तक्रार आहे. असे असतानादेखील मुख्याध्यापिका प्रीती बराटे यांनी शिक्षण विभागाच्या नोटीसीकडे दुर्लक्ष करीत आपणच कसे बरोबर आहोत हे सांगण्यासाठी शिक्षण विभागाला 13 जुलै 2022 रोजी उलट उत्तर देऊन लिड शिक्षण पध्दत कशी योग्य आहे, हे सांगण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यामध्ये शासनाच्या मान्यतेबाबत काहीही सफाई दिली नाही. तसेच जास्तीचे 3600/- रू. घेत असल्याबाबत देखील कोणतीच बाब सांगितली नाही. त्यामुळे गटशिक्षण अधिकारी अरूणादेवी मोरे यांनी पेण प्रांत कार्यालयात 12 जुलै रोजी झालेल्या बैठकीचा संदर्भ देऊन महाराष्ट्र शासनाच्या 24 फेब्रुवारी 2022 च्या पत्राचा संदर्भ देत लिड शिक्षण प्रणाली त्वरित बंद करण्यास सांगितले व 3600/- रू. जास्तीची घेतलेली फी त्वरित पालकांना परत करावे. जर असे केले नाही, तर संस्थेविरूद्ध ठोस कारवाई करून वरिष्ठ कार्यालयात कळविले जाईल. असे असतानादेखील पी.एस.एम.एस. इंग्लिश मिडियम स्कूलकडून लिड शिक्षण प्रणालीच शिकविण्यासाठी पालकांवर दबाव टाकला जात असून, पालकांच्या इच्छेविरूद्ध ना हरकत दाखले घेतले जात आहेत. त्यामुळे गटशिक्षण अधिकार्‍यांच्या आदेशापेक्षा आपल्याला श्रेष्ठ मानून सदर स्कूल मुजोरगिरीचे प्रदर्शन करीत आहे.

Exit mobile version