| हमरापूर | प्रतिनिधी |
हमरापूर ग्रामपंचायतीतर्फे हमरापूर विभाग श्री गणेश उत्कर्ष मंडळाचे माजी अध्यक्ष कुणाल पाटील यांचा पीओपीच्या लढ्यात महत्त्वाची भूमिका बजावल्याबद्दल सत्कार करण्यात आला.
पीओपी गणेशमूर्तीमुळे प्रदूषण होते असे कारण देत प्रदूषण नियंत्रण मंडळाने पीओपीच्या गणेशमूर्ती बनवणे तसेच विसर्जनावर बंदी लादली होती. यासंदर्भात गणेशमूर्तीकारांनी न्यायालयात दावा दाखल केला होता. गेले वर्षभर या लढ्यात माजी अध्यक्ष कुणाल पाटील हे संघटनेला सोबत घेऊन लढत होते व प्रसार माध्यमांसोबत पीओपीचे गणेशमूर्ती हानिकारक नाहीत हे पटवून देऊन मूर्तिकारांची बाजू ठामपणे मांडत होते.
नुकताच न्यायालयाने पीओपीच्या गणेश मूर्ती बनवने व त्या विसर्जनावर बंदी घातली नसल्याचा निकाल दिला आहे, त्यामुळे पेणसह हमरापूर विभागातील सर्व गणेश मूर्तिकार आनंदीत झाले आहेत. सर्व मूर्तिकारांनी नुकताच रॅली काढून आपला आनंद साजरा केला. या विजयामध्ये कुणाल पाटील यांनी मोठी भूमिका बजावल्याने हमरापूर ग्रामपंचायतीचे उपसरपंच रवींद्र शेदवळ, सदस्य युवराज म्हात्रे आदींच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.