अलिबागची बैठक करावी लागली रद्द
| रायगड | खास प्रतिनिधी |
इंडिया आघाडीत असताना सत्तेचे केंद्रबिंदू महाराष्ट्रात शरद पवार हे होते. महायुतीत सामील झाल्यावर ते दिल्ली झाले आहे. महायुतीतून सुनील तटकरे यांची उमेदवारी अद्याप घोषित करण्यात आलेली नाही. भाजपा या जागेवर दावा सांगत असल्याने तटकरेंची चांगलीच अडचण झाली आहे. जागेचा तिढा सोडवण्यासाठी आणि छोट्या-छोट्या गोष्टींसाठी त्यांना सातत्याने दिल्ली दरबारी झुकावे लागत असल्याचे चित्र आहे.
महायुतीमध्ये रायगड लोकसभा मतदारसंघावर दावे-प्रतिदावे केले जात आहेत. अशातच गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसची (अजित पवार गट) अलिबाग येथे प्रमुख नेते आणि पदाधिकारी यांची बैठक पार पडणार होती. मात्र, माजी खासदार सुनील तटकरे यांना स्वतःच्या उमेदावारीसह पक्षातील अन्य इच्छुकांसाठी अचानक दिल्ली दरबारी मुजरा करण्यासाठी जावे लागल्याने बैठक रद्द करावी लागल्याचे बोलले जाते. दरम्यान, शनिवारी उशिरापर्यंत महायुतीमधील जागा वाटपाचा तिढा सुटण्याची शक्यता आहे. अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणार्या छत्रपती शिवाजी महाराजांनी दिल्ली दरबारी बाद‘शाह’ला कधीच मुजरा केला नाही, आता मात्र महाराष्ट्रातील मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री, खासदार, आमदार यांना दिल्ली दरबारी शाहा यांना मुजरा करावा लागत आहे. त्यांच्यापुढे लोटांगण घातल्याशिवाय पदरात काहीच पडत नाही, हे आजवरच्या राजकीय प्रवासातून अधोरेखित होते.
रायगड लोकसभा मतदारसंघातून इंडिया आघाडीतून शिवसेना ठाकरे गटाचे अनंत गीते यांचे पक्के झाले आहे. गीते यांच्या नावाची घोषणा झाल्याने त्यांनी प्रचाराला जोरदार सुरुवात केली आहे. रायगडमध्ये शेकापची मोठी ताकद आहे, तसेच काँग्रेसनेही गीते यांच्यासाठी हिरवा कंदील दिला आहे. त्यामुळे इंडिया आघाडीचे उमेदवार गीते यांच्या दंडामध्ये प्रचंड बळ आले आहे. त्यांच्या झंझावाती प्रचाराला सुरुवात झाली आहे. शेकापचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील, माजी आमदार पंडित पाटील, रायगड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष आस्वाद पाटील, महिला आघाडीप्रमुख चित्रलेखा पाटील यांनी पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मतदारांना एकजूट करण्यात मुसंडी मारल्याचे चित्र आहे. दुसरीकडे मात्र महायुतीचा उमेदवार कोण आहे, हे अद्याप ठरलेले नाही. तसे बघायला गेले तर, रायगड मतदारसंघावर सुनील तटकरे यांचा दावा आहे. भाजपानेदेखील ही जागा आपल्या पदारात पाडून घेण्याची तयारी केली आहे. तसे न झाल्यास धैर्यशील पाटील यांना अपक्ष उभे करुन पाठिंबा देण्याची व्यूहरचना आखल्याचीही जोरदार चर्चा आहे.
सुनील तटकरे यांनी गुरुवारी अलिबाग-खडताळ पूल येथील हॉरीझोन सभागृहात राष्ट्रवादीच्या पदाधिकार्यांची बैठक बोलवली होती. त्यामुळे तटकरे यांची उमेदवारी पक्की झाले असे सर्वांना वाटल्याने पदाधिकारीदेखील खुश होते. मात्र, आयत्या वेळी तटकरे यांनी सदरची बैठक रद्द करण्यास सांगितले. त्यामुळे बैठकीचे नियोजन पाहणारे पदाधिकारी चक्रावून गेले. नेमके काय घडले हे त्यांना कळले नाही. साहेब तातडीने दिल्लीला गेले आहेत, एवढाच मेसेज संबंधित पदाधिकार्यांना आला. त्यामुळे जेवणाची केलेली तयारी, मंडप, सजावट असे सर्वच व्यर्थ गेले.
महत्त्वाच्या बैठकीसाठी सुनील तटकरे यांना दिल्लीला जावे लागल्याने बैठक रद्द करावी लागली. रायगड लोकसभेची उमेदवारी तटकरे यांनाच मिळणार आहे. भाजपाकडून उरण पॅटर्न राबवण्यात येणार असेल, तर ते युती धर्माच्या विरोधातील कृत्य ठरेल. आम्ही विजयासाठी प्रयत्न करणार.
मधुकर पाटील, जिल्हाध्यक्ष,
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार)
पूर्वी सत्तेचे केंद्रबिंदू महाराष्ट्रात शरद पवार हे होते. त्यांच्या पाठीत खंजीर खुपसून आता दिल्ली दरबारी मुजरा करावा लागत आहे, ही लाजिरवाणी गोष्ट आहे. इंडिया आघाडीत असताना त्यांच्याकडे छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेला स्वाभिमान होता. आता तो गुंडाळून ठेवावा लागला आहे. इंडिया आघाडीने गीतेंच्या रुपाने स्वच्छ चारित्र्याचा उमेदवार दिल्याने विजय आमचाच आहे.
आमिर खानजादा, जिल्हाध्यक्ष,
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार)