बहुआयामी व्यक्तिमत्त्व

आगरी म्हटल्यानंतर ज्याच्या प्रत्येक वागण्यात रग आणि धग असते तो आगरी. आगरी माणसाचे एक वैशिष्ट्य आहे- तो कुणाच्या वाट्याला जात नाही आणि जर कुणी त्याच्या वाट्याला आला, तर त्याला तो सोडत नाही. आगरी माणूस दुसऱ्याच्या संकटात धावून जाणारा, बाहेरुन आलेल्यांचे आदरातिथ्य करणारा, दुसऱ्यासाठी जीवन धोक्यात घालणारा, दिलेल्या वचनाला जागणारा, भुकेल्याची भूक जाणणारा, असे सर्वगुण असणाऱ्या एका आगरी वाघाचा परिचय मी या लेखातून करून देणार आहे.

आगरी समाजात अनेक नवरत्नं झाली. परंतु, आगरी समाजाचा ज्या वेळेला राजकीयदृष्ट्या विचार करतो, त्या वेळेला राजकारणात धुरंधर असे नेतृत्व बोटावर मोजणारेच. आज कुळ कायद्याचे श्रेय अनेकजण घ्यायला बघतात; परंतु कुळ कायद्याचे खरे जनक आप्पासाहेब तथा ना.ना. पाटीलच. हे आगरी समाजाचे खरे विचारवंत, बुद्धिवंत आणि बहुआयामी व्यक्तिमत्त्व. आप्पासाहेबांनंतर नाव घ्यायचे झाले तर बॅ. ए.टी. पाटील. बॅ. ए.टी. पाटलानंतर राजकारणात व समाजकारणात अनेक आगरी समाजाच्या व्यक्ती आल्या; परंतु आपला ठसा ज्या पद्धतीने उमटायला पाहिजे होता, त्या पद्धतीने उमटवू शकल्या नाहीत. मात्र, एक नाव जर आगरी समाजाच्या जडणघडणीमध्ये घेतले नाही तर आगरी समाजावर अन्याय झाल्यासारखा होईल. ते नाव म्हणजे, ना.ना. पाटलांचे नातू तथा प्रभाकर पाटलांचे सुपुत्र भाई जयंत प्रभाकर पाटील. रायगडच्या राजकारणातील एक धुरंधर, मुत्सदी आणि भावनाप्रधान नेता. या उपाधीबरोबर भाईंना ‌‘आगरी वाघ’ म्हटल्यास वावगं ठरणार नाही.

विचारवंत आप्पासाहेबांच्या घरात-कुटुंबात जन्माला आलेले भाई जे उंचीने कमी आहेत, ज्यांना अनेक वेळा त्यांच्या उंचीवरून ट्रोल केले जाते; परंतु त्यांच्या कर्तृत्वाची उंची एवढी मोठी आहे की, ट्रोल करणाऱ्यांची बोलती बंद होईल. आज राजकारणात अनेकजण छक्के पज्यांचे खेळ खेळतात. पण, ते भाईंना जमत नाहीत. त्यामुळे बऱ्याच वेळेला त्यांना त्याचं नुकसानही सोसावे लागले. भाई हे किती दिलदार आहेत हे सांगायचे झाल्यास मागील जिल्हा परिषद निवडणुकीचा दाखला देता येईल. मित्रपक्षाच्या सदस्यांपेक्षा शेकापक्षाच्या दुपटीने जागा निवडून आल्या असताना दिलेला शब्द पाळून मित्रपक्षाला जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद दिले. त्याचा पुढे भाईंना पक्षासाठी तोटाच झाला; परंतु, भाईंनी त्याचा विचारही केला नाही. भाईंचे राजकारण हे भावनाप्रधान आहे. त्यांच्या राजकारणात भावनेला विशेष जागा आहे. असे राजकारणातले एक ना अनेक दाखले देता येतील, तेथे भाईंनी कधीच इतर राजकारण्यांसारखा तिरकस विचार केला नाही, अथवा फायद्याचा विचार केला नाही. शब्दाचा पक्का आणि दिलेला शब्द राजकारणात पाळायला हवा या विचारापासून भाई कधीच मागे सरले नाहीत. परंतु, त्यांच्या या प्रेमळ आणि भावनाप्रधान स्वभावाचा अनेक जणांनी स्वतःच्या हितासाठी राजकारणात फायदा करून घेतला. इतर जण आपला फायदा करून घेत आहेत, हे भाईंना माहिती असूनसुद्धा भाईंनी इतर राजकारण्यांप्रमाणे समोरच्याला कधी दुखावलं नाही. आज भाईंनी राजकीय, शैक्षणिक, सहकार, उद्योग, कला, शेती या क्षेत्रांमध्ये यशस्वीपणे गरुडझेप घेतली आहे. भाईंचं व्यक्तिमत्त्व अष्टपैलू आहे.

भाईंना आगरी वाघ का म्हणावं याची कारणे अनेक आहेत. पण, मला आवर्जुन एक बाब नमूद करायला आवडेल; ती म्हणजे, गेट ऑफ इंडिया येथील किंग खानची कानउघाडणी. सर्वसामान्यांसाठी अधिकारीवर्गाला खडसावून सांगणे, विधिमंडळात आपले मुद्दे अभ्यासपूर्ण व पोटतिडीकीने मांडून त्या मुद्द्याला योग्य तो न्याय मिळवून देणे, यासह अनेक गोष्टी आपल्याला नमूद करता येतील. महत्त्वाची बाब म्हणजे, भाईंना आगरी असल्याचा सार्थ अभिमान आहे. त्यांच्या बोलण्यातून कित्येक वेळा हे जाणवते की, आगरी हे संघटित झाले पाहिजेत. ते आवर्जून आपल्या भाषणात सांगतात की, मी आगरी आहे. या बहुआयामी अष्टपैलू नेत्याला वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा.

– संतोष मंदा लक्ष्मण पाटील

Exit mobile version