। पनवेल । प्रतिनिधी ।
खारघर परिसरात सोमवारी (दि.20) दुपारच्या सुमारास भीषण अपघाताची घटना घडली. पनवेलकडे जाणाऱ्या मार्गिकेवर 5 ते 6 वाहनांची साखळी धडक झाल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली.
मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी अचानक एका वाहनाने ब्रेक लावल्यानंतर मागून येणाऱ्या वाहनांनी एकमेकांना धडक दिली. या साखळी अपघातात अनेक चारचाकी गाड्यांचे मोठे नुकसान झाले असून, काही वाहनांच्या पुढील भागाचे चेंदामेंदा झाले. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि वाहतूक विभागाचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले असून, काही जणांना किरकोळ दुखापत झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या घटनेमुळे पनवेलकडे जाणाऱ्या मार्गावर काही काळ मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. पोलिसांनी तत्काळ परिस्थिती नियंत्रणात आणत वाहतूक सुरळीत करण्याचे काम केले. दरम्यान, अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून अधिक तपास सुरू आहे.
खारघरमध्ये अनेक वाहनांची एकमेकांना धडक; वाहतूक ठप्प
