| मुंबई | प्रतिनिधी ।
छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ येत्या 7 मे रोजी सकाळी 11 ते सायंकाळी 5 या वेळेत सहा तासांसाठी पूर्णपणे बंद राहणार आहे. या कालावधीत कोणतेही विमान उड्डाण घेणार किंवा उतरणार नाही. विमानतळ प्रशासनाच्या माहितीनुसार, 09/27 आणि 14/32 या दोन्ही रनवेवर दुरुस्तीची कामे केली जाणार आहेत. पावसाळ्यापूर्वी सुरक्षेच्या दृष्टीने ही डागडुजी आवश्यक असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. या कामाचे नियोजन गेल्या सहा महिन्यांपासून सुरू असून सर्व विमान कंपन्यांना पूर्वसूचना देण्यात आली आहे. प्रवाशांना त्रास होऊ नये यासाठी उड्डाणांचे वेळापत्रक आधीच बदलण्यात आले आहे.







