शिवमुद्रा, शिवशक्ती, शिवनेरी, नवोदित, गुड मॉर्निग तिसरी फेरीत
| मुंबई | प्रतिनिधी |
शिवमुद्रा, शिवशक्ती, शिवनेरी, नवोदित, गुड मॉर्निग यांनी मुंबई शहर कबड्डी असो. ने आयोजित केलेल्या जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत पूर्व विभाग कुमार गटात तिसरी फेरी गाठली. मुंबईतील भारतीय क्रीडा मंदिराच्या पटांगणावर सुरु असलेल्या कुमारांच्या दुसऱ्या फेरीत शिवमुद्रा प्रतिष्ठानने पूर्वार्धातील 21-22 अशा पिछाडीवरून समर्थ स्पोर्टस्चे आव्हान 42-37 असे संपविले. अर्णव हातणकर, ओमकार कुळे, स्वयंम बेंडले यांच्या उत्तरार्धातील चतुरस्त्र खेळाला या विजयाचे श्रेय जाते. समर्थच्या श्रेयस होडगे, देव परब यांचा पूर्वार्धातील जोश उत्तरार्धात कमी पडला. शिवशक्ती मंडळाने साई चौगुले, अभिषेक किटे यांच्या झंझावाती खेळाने दादोजी कोंडदेवचा 48-15 असा पाडाव केला. कोंडदेवचा कुणाल कोळेकर चमकला.
शिवनेरी सेवा मंडळाने वीर स्पोर्टस्ला 46-37 असे नमवीत आगेकूच केली. यश चोरगे, सुचित राणे शिवनेरीकडून, तर हर्ष बबडू, मंगेश कदम वीर स्पोर्टस्कडून उत्कृष्ट खेळले. नवोदित संघाने दुर्गामाता स्पोर्टस् ला 40-38 असे चकवीत आपली धोडदौड सुरूच ठेवली. अर्जुन कोकरे, प्रथमेश चव्हाण यांच्या चढाई पकडीच्या उत्कृष्ट खेळाने नवोदितने विश्रांतीला 25-18 अशी आघाडी घेतली होती. विश्रांतीनंतर तनिष चव्हाण, निलेश मोरे यांनी चुरशीचे लढत देत सामना रंगतदार अवस्थेत आणला. पण संघाला विजयी करण्यात ते कमी पडले. गुड मॉर्निंग स्पोर्टस्ने गौरीदत्त संघाला 52-22 असे सहज पराभूत केले. आशिष पवार, दिनेश गवाटी, आर्यन पवार यांच्या तुफानी खेळाला या मोठ्या विजयाचे श्रेय जाते. गौरीदत्तचा सुंदरम गुप्ता बरा खेळला.







