रानपाखर आश्रमशाळा अंतिम विजेता
। पालघर । प्रतिनिधी ।
मुंबई विभाग शालेय कबड्डी स्पर्धेत पेण वरप येथील रानपाखर आश्रमशाळेने मुंबई उपनगर संघाचा 24 गुणांनी पराभव करुन विजेतेपद पटकावले. सदर संघ राज्यस्तरीय स्पर्धेस पात्र ठरला आहे. या स्पर्धा क्रीडा युवक सेवा संचनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी व जिल्हा क्रीडा परिषद पालघरद्वारा आयोजित केल्या होत्या.
मुंबई विभागीय 14 वर्षा खालील मुले व मुलींच्या कबड्डी स्पर्धेचे आयोजन पालघर येथील राजगुरू ह. म. पंडित विद्यालय सफाळे, पालघर येथे करण्यात आले होते. सदर स्पर्धेत एकूण मुंबई विभागातील 16 संघानी सहभाग घेतला होता. त्यात 14 वर्षा खालील मुलांच्या गटात पवार पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टच्या रानपाखरं आश्रमशाळा वरप ता पेण, जि.रायगड या संघाने रायगड जिल्ह्याचे नेतृत्व करताना उपउपांत्य फेरीत भिवंडी संघाचा पराभव केला. तर उपांत्य फेरीत स्थानिक पालघर संघाचा पराभव करून अंतिम फेरी गाठली. अंतिम सामन्यात मुंबई उपनगर संघाचा सहज 24 गुणांनी पराभव करून अंतिम विजेतेपद पटकावले. सदर संघ राज्यस्तरीय स्पर्धेस पात्र ठरला आहे. त्या बद्दल सर्व स्तरातून सहभागी खेळाडू विद्यार्थी, मार्गदर्शक शिक्षक,मुख्याध्यापक संजय नाईक यांचे कौतुक होत आहे. संस्थेच्या विश्वस्त खासदार सुप्रिया सुळे यांनी खेळाडूंचे विशेष अभिनंदन केले आहे.