। मुंबई । प्रतिनिधी ।
अंधेरी येथील घरात गॅसगळतीमुळे लागलेल्या आगीत तीन जण जखमी झाले आहेत. त्यातील एकाची प्रकृती चिंताजनक असून तिघांवरही रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
अंधेरी पूर्वेकडील काजूपाडा परिसरातील एका सोसायटीतील घरात आग लागली. घरगुती गॅस सिलिंडरमधून गळती झाल्याने ही आग लागली. या आगीत तीन जण होरपळले आहेत. बुधवारी रात्री 8 वाजता लागलेली आग साधारण पावणे नऊ वाजताच्या सुमारास नियंत्रणात आणण्यात आली, अशी माहिती देण्यात आली. या आगीत तीन जण जखमी झाले आहेत. या तिघांनाही सुरुवातीला राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. एकाची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला पुढील उपचारासाठी सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले.
या आगीत हकिम मुल्ला खान (वय 50), सोहेल खान (वय 24) आणि सलीम अन्सारी (वय 38) हे जखमी झाले आहेत. या तिघांनाही राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या आगीत दोघे जण 10 ते 15 टक्के भाजले असल्याची माहिती देण्यात आली. तर सलीम अन्सारी हा तरूण 85 टक्के भाजला आहे. त्याला पुढील उपचारासाठी राजावाडीतून सायन रुग्णालयात हलवण्यात आले आहे. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती देण्यात आली.