। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
मुंबई गेटवे ते मांडवा या जल मार्गाची प्रवासी वाहतूक सेवा पावसाळा सुरु होणार असल्यानं तीन महिने बंद ठेवण्यात येणार आहे. 26 मे ते 31 ऑगस्टदरम्यान प्रवासी जलवाहतूक बंद ठेवली जाते. त्यामुळे आता मांडवाहून मुंबईला येणाऱ्यांना रस्ते मार्गानेच मुंबई गाठावी लागणार आहे. परिणामी लाटांवर हेलकावे खात मांडवा घाठण्यासाठी काही दिवस ब्रेक घ्यावा लागेल. महाराष्ट्र सागरी मंडळ विभागाने प्रवासी जलवाहतूक कंपन्यांना ही वाहतूक बंद ठेवण्याबाबत पत्र दिलं आहे. खबरदारी म्हणून पावसाळ्यात जलवाहतूक बंद ठेवली जाते. त्यानुसार 26 मे पासून 31 ऑगस्टपर्यंत ही वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. दरम्यान, रो रो सेवा मात्र सुरूच राहणार आहे.
मांडवा ते गेट वे ऑफ इंडिया या जलवाहतुकीला अनेकांची प्रसंती पाहायला मिळाली आहे. रायगड किंवा अलिबागमध्ये जाणाऱ्यांना स्वस्त दरात आणि कमी वेळेत मुंबई गाठणं या जलवाहतुकीमुळे शक्य होतं. त्याचप्रमाणे असंख्य पर्य़टकही या जलवाहतुकीचा आनंद घेण्यासाठी येत असतात. पीएनपी, मालदार, अजंठा, अपोलो या कंपन्यांच्या बोटी मांडवा ते गेट वे जलवाहतूक मार्गावर प्रवासी सेवा देतात. पावसाळ्याचे चार महिने ही सेवा बंद केली होते. आजपासून ही जलवाहतूक खबरदारीच्या कारणास्तव बंद करण्यात येणार आहे.
पर्यटनावर परिणाम
पावसाळ्यात बंद राहणाऱ्या या जलवाहतुकीचा परिणाम अलिबाग आणि रायगडमधील पर्यटनावरही होतो. मुंबईकरांची मांडवा किनाऱ्याला पर्यटनासाठी पसंती असते. मांडवा इथं पर्यटनाच्या दृष्टीनं अनेक गोष्टींचा विकास झाला आहे. वेगवेगळ्या समुद्री खेळांसह निवांत आणि शांत वातावरणासाठी हाकेच्या अंतरावर असलेल्या मांडवाला पर्यटकांची पसंती असते.
आठ ते नऊ महिन्यांत जवळपास दर दिवशी हजार ते दीड हजार प्रवाशी पर्यटनासाठी जलवाहतुकीद्वारे इथं मुंबईहून येत असतात. मात्र जलवाहतूक बंद असल्यानंतर अलिबागसह मांडवा इथल्या पर्यटनावरही परिणाम जाणवतो.