मुंबई इंडियन्सचा ताफा अलिबागेत 

रेडीसन रिसॉर्टमध्ये घेणार विश्रांती

| अलिबाग | प्रतिनिधी |

आयपीएलचा रणसंग्राम 22 मार्चपासून सुरू होत आहे. या स्पर्धेत आयपीएल मधील महत्वपूर्ण संघ मुंबई इंडियन्स हार्दिक पांडे यांच्या नेतृत्वाखाली सहभागी होणार आहे. मुंबई इंडियन्स संघाला खेळण्याआधी विश्रांती मिळावी यासाठी पूर्ण ताफा अलिबाग येथील रेडीसन रिसॉर्टमध्ये मंगळवारी दाखल झाला आहे. दोन दिवस हा संघ रिसॉर्टमध्ये राहणार आहे. त्यामुळे मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. गेटवे येथून 12 जणांचा ताफा मांडवा येथे जलवाहतूकीने दाखल झाला आहे. 


गेटवे येथे बसने मुंबई इंडियन्स संघ मंगळवारी (दि.19) सकाळी दाखल झाली. त्यानंतर सर्व ताफा पीएनपी जलवाहतूकीने मौज मजा करीत मांडवा येथे दाखल झाला. त्यानंतर बसने हा संघ अलिबाग-गोंधळपाडा येथील रेडीसन रिसॉर्टमध्ये दाखल झाली. यावेळी रिसॉर्ट प्रशासनाने टीमचे पारंपरिक पद्धतीने स्वागत केले. एक दिवस मुंबई इंडियन्स संघ अलिबागमध्ये रिसॉर्टला राहणार आहे. त्यानंतर बुधवारी (दि.20) हा संघ झिराड येथील एका खासगी फार्म हाऊसवर राहण्यास जाणार आहे. यावेळी हार्दिक पांड्या, आकाश मढवाल, अंशुक कंबोज, अर्जुन तेंडुलकर, डेवॉल्ड ब्रेव्हिस, दीलशान मदुशंका, गेराल्ड कोएत्झी, इशान किशन, कुमार कार्तिकेया, मोहम्मद नबी, नमन धीर, नेहाल वढेरा, नुवान तुशारा, पीयूष चावला, रोमारिओ शेफर्ड, शाम्स मुलानी, शिवलिक शर्मा, श्रेयस गोपाल, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, टीम डेव्हिड, विष्णू विनोद, ल्युक वूड आदींसह प्रशिक्षक असा 52 जणांचा ताफा रेडिसन रिसॉर्टमध्ये दाखल झाला आहे.

मुंबई इंडियन्स संघ रेडीसन रिसॉर्टमध्ये दाखल झाल्यानंतर रिसॉर्टमधील पर्यटकांची त्यांच्यासोबत फोटो काढण्यासाठी लगबग सुरू होती. यावेळी पीयूष चावला याच्यासोबत बच्चे कंपनीने फोटो काढले.

Exit mobile version