| मुंबई | प्रतिनिधी |
देशात दररोज महिलांवरील हिंसाचार, गुन्हे आणि हत्येच्या बातम्या समोर येतात. दरम्यान, राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी नुकताच महिला सुरक्षेवरील राष्ट्रीय वार्षिक अहवाल जाहीर केला आहे. यातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. अहवालानुसार, देशाच्या शहरी भागातील 40 टक्के महिलांना असुरक्षितता वाटते. या अहवालासाठी 31 शहरांमधील 12,770 महिलांचे सर्वेक्षण करण्यात आले. गेल्या काही दिवसांत अशा अनेक हृदयद्रावक घटना समोर आल्या आहेत, ज्यामुळे पालकांची चिंता आणखी वाढली आहे.
देशाचा एकूण सुरक्षा निर्देशांक 65 टक्के इतका नोंदला गेला असून, शहरांचे मूल्यमापन ‘अत्यंत चांगले’, ‘चांगले’, ‘कमी’, ‘अत्यंत कमी’ अशा श्रेणींमध्ये करण्यात आले. सर्वेक्षणानुसार, मुंबई, कोहिमा, विशाखापट्टणम, भुवनेश्वर, ऐझॉल, गंगटोक आणि इटानगर ही शहरे महिलांसाठी सर्वात सुरक्षित ठरली आहेत. याउलट, पाटणा, जयपूर, फरिदाबाद, दिल्ली, कोलकाता, श्रीनगर आणि रांची ही शहरे सर्वात कमी सुरक्षित असल्याचे दिसून आले आहे. दिल्ली आणि फरीदाबाद हे पहिल्या पाच असुरक्षित शहरांमध्ये आहेत, जिथे जवळजवळ 42 टक्के महिलांनी असुरक्षित असल्याचे मत नोंदवले. रांचीमध्ये हा आकडा आणखी जास्त आहे तिथे 44 टक्के महिलांनी असुरक्षित असल्याचे सांगितले. ईशान्य भारतातील कोहिमा शहरात 80 टक्क्यांपेक्षा जास्त महिलांनी सुरक्षितेची भावना बोलून दाखवली. या शहरने देशातील महिलांसाठी सर्वात सुरक्षित ठिकाण म्हणून अव्वल स्थान मिळवले आहे. तर विशाखापट्टणम, भुवनेश्वर, ऐझॉल, गंगटोक, इटानगर आणि मुंबई येथे जवळजवळ 70टक्के महिलांनी सुरक्षित असल्याचा अनुभव व्यक्त केला.






