| नूल | प्रतिनिधी |
नूल येथील तिरंगा क्रीडा मंडळ, न्यू इंग्लिश स्कूल आणि आजी-माजी खेळाडू यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय हॉकी स्पर्धेला आज उत्साहात प्रारंभ झाला. पहिल्या दिवशी मुंबईचा महाराष्ट्र पोलीस, कोल्हापूर पोलीस, इचलकरंजीचे महाराष्ट्र मंडळ यांनी प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून विजयी सलामी दिली. यजमान तिरंगा क्रीडा मंडळाने बेळगावला 2-1 असे नमवून उपांत्य फेरी गाठली.
लाकल्लाप्पाण्णा नडगदल्ली यांच्याहस्ते स्पर्धेचे उदघाटन झाले. यावेळी ज्येष्ठ प्रशिक्षक एस. आऱ. जाधव, श्रीरंग चौगुले, जयसिंगराव चव्हाण यांच्यासह खेळाडू उपस्थित होते. सचिन शिंदे यांनी स्वागत केले. सचिन पोवार यांनी आभार मानले. पहिल्या सामन्यात तिरंगा क्रीडा मंडळाने बेळगावचा 2-1 असा पाडाव केला. तिरंगाच्या रितेश मांगलेने पहिला मैदानी गोल करून धडाकेबाज सुरवात केली. पण, बेळगावच्या प्रवीणने गोल करून सामन्यात 1-1 अशी बरोबरी साधली. उत्तरार्धात तिरंगाच्या प्रज्वल काळेने निर्णायक गोल करून स्थानिक शौकिनांना जल्लोषाची संधी दिली.
दुसऱ्या सामन्यात इचलकरंजी महाराष्ट्र क्रीडा मंडळाने फिरोज वस्ताद, सरोज पाटीलच्या गोलमुळे गदग स्पोर्टसवर 2-1 अशी मात केली. गदगचा गोल करणारा जीवनची झुंज व्यर्थ ठरली. रंगतदार सामन्यात मुंबई पोलिसने कोल्हापूरच्या महाराष्ट्र क्रीडा मंडळाला 2-1 असे पराजित करून आव्हान संपुष्टात आणले. दोन गोल करणारा मुंबईचा रोहन पोवार विजयाचा शिल्पकार ठरला. चौथ्या सामन्यात कोल्हापूर पोलीस संघाने ईश्वरपूरच्या निशिकांतदादा फाउंडेशनला 3-1 असे हरवून आगेकूच केली. कोल्हापूरच्या सत्यजित सावंत, विनोद मनुगडे, मुकूंद रजपूत यांनी प्रत्येकी एक गोल मारला. ईश्वरपूरच्या स्वप्निल पाटीलचा गोल संघाचा पराजय टाळू शकला नाही.






