मुंबईची पहिल्या डावात आघाडी

बडोदाच्या पहिल्या डावात 348 धावा; मुंबई तिसर्‍या दिवसअखेर 1 बाद 21

| मुंबई | वृत्तसंस्था |

कर्णधार विष्णु सोलंकी(136) व शाश्‍वत रावत(124) यांच्या शतकी खेळीनंतरही रणजी करंडक स्पर्धेच्या उपांत्यपूर्व सामन्यात मुंबईविरुद्ध बडोदाला आघाडी मिळवण्यात अपयश आले. मुंबईने बडोदाला 348 धावांत गुंडाळत 36 धावांची आघाडी घेण्यात यश मिळवले. तिसर्‍या दिवसअखेरीस मुंबईने आपल्या दुसर्‍या डावात 1 बाद 21 धावा केल्या आहे व त्यांच्याकडे एकूण 57 धावांची आघाडी आहे. खेळ संपला तेव्हा हार्दिक तामोरे 12 व मोहित अवस्थी 3 धावांवर खेळत होते.

बडोदा संघाने तिसर्‍या दिवशी 2 बाद 127 धावसंख्येच्या पुढे खेळण्यास सुरुवात केली. शाश्‍वत व सोलंकी यांनी शतक झळकावण्यासह तिसर्‍या गड्यासाठी 174 धावांची निर्णायक भागीदारी रचली. संघ मोठी धावसंख्या उभारेल असे चित्र असताना त्यांच्या उर्वरित फलंदाजांनी निराशा केली. त्यांनी आपले अखेरचे आठ फलंदाज अवघ्या 91 धावांतच गमावले. त्याचा फटका संघाला बसला व त्यांना पहिल्या डावात आघाडी मिळवता आली नाही. मुंबईकडून फिरकीपटू शम्स मुलानीने (4/121) सर्वाधिक गडी बाद केले. त्याला तुषार देशपांडे (2/52) व तनुष कोटियन (2/49) यांनी चांगली साथ मिळाली. देशपांडेने रावतला बाद करीत ही निर्णायक भागीदारी मोडीत काढली. यानंतर मुंबईच्या गोलंदाजांनी सामन्यात मागे वळून पाहिले नाही. पहिल्या डावात फलंदाजी करणार्‍या बडोदा संघाच्या रावत व सोलंकीने अनुक्रमे 15 आणि 14 चौकार लगावले.

आपल्या दुसर्‍या डावात मुंबईची सुरुवात चांगली झाली नाही. सलामीवीर भूपेन लालवानीला (6) भार्गव भटने बाद करीत मुंबईला पहिला धक्का दिला. यानंतर तामोरे व मोहित यांनी संयमाने खेळ केला.

Exit mobile version