मुंबई लाईफलाइन पुन्हा बंद होणार?

राजेश टोपे यांची माहिती
। मुंबई । वृत्तसंस्था ।
भारतात पुन्हा एकदा कोरोनाचा कहर वाढत असून, वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्‍वभूमीवर विविध राज्यात कठोर निर्बंधांचा अंमलबजावणी करण्यात येत आहे. यानुसार मुंबईची लाईफलाइन असणारी लोकल पुन्हा एकदा बंद होणार का? याबाबत उलटसुलट चर्चा सुरु झाल्या आहेत. याबाबत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी प्रसारमाध्यमांना महत्त्वाची माहिती दिली आहे.
देशातील अन्य राज्यांमध्ये निर्बंध कठोर करण्यात आल्याने राज्यातही कोरोना रुग्णसंख्या वाढीच्या पार्श्‍वभूमीवर निर्बंधात वाढ करण्यात येणार आहे. राज्यात करोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने पुन्हा एकदा आरोग्य यंत्रणेवर ताण पडण्याची शक्यता आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली नुकताच महत्वाची बैठक पार पडली. यावेळी कोणते उपाय योजता येईल याबाबत चर्चा झाली.
दरम्यान मुंबईतील उपनगरीय रेल्वे प्रवाशांवर सध्या तरी कोणतेही निर्बंध लागू केले जाणार नाहीत, असे मंत्रालयातील उच्चपदस्थांकडून सांगण्यात आले आहे. यालाच दुजोरा देत राजेश टोपे यांनीदेखील मुंबईची लोकल सध्या बंद करण्याचा कोणताही विचार सरकारसमोर नसल्याचे स्पष्ट केले आहे. यावेळी त्यांनी जिल्हांतर्गत बंदी लावण्याचाही राज्य सरकारचा कोणता विचार नाही अशी माहिती दिली.
कोरोनाचे रुग्ण वाढत असताना मध्य व पश्‍चिम रेल्वे उपनगरीय मार्गावरील लोकल गाडयांना प्रवाशांची प्रचंड गर्दी आहे. सध्या ओमायक्रॉन संसर्गाचा वाढता वेग पाहता सरकारी, खासगी कार्यालयीन उपस्थिती 50 टक्के करावी आणि अर्थचक्र न थांबता लोकल प्रवासासाठी वेळेची मर्यादा आणण्याची मागणी प्रवासी संघटनांनी केली आहे.

याशिवाय राज्यातील करोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर राज्यात निर्बंध कडक केले जात आहेत. मात्र वीकेण्ड लॉकडाउन, नाईट कर्फ्यू या सगळ्या संदर्भात चर्चा झालेल्या आहेत. परंतु, अद्याप निर्णय कुठेलेही झालेले नाहीत. याबाबत मुख्यमंत्री निर्णय घेतील. तसेच जिल्हांतर्गत बंदी देखील तूर्त कुठलीही नसल्याचा पुनर्रुच्चार राजेश टोपे यांनी केला.

रुग्णसंख्येत गेल्या आठवड्याभरापासून वाढ होत असून मुंबई उपनगरीय रेल्वेवरील वाढत्या गर्दीबाबत राज्य सरकारने निर्णय घेतलेला नाही. यापूर्वीही उशिराने वेगवेगळे निर्णय घेतल्यामुळे बराच गोंधळ उडाला होता. आता लोकलमधील गर्दीवर नियंत्रणासाठी कार्यालयीन उपस्थिती 50 टक्के करण्याचे आदेश त्वरित काढावे.
लता अरगडे, सरचिटणीस
उपनगरीय रेल्वे प्रवासी एकता संस्था.

डिसेंबर 2021 मध्ये मध्य रेल्वे उपनगरीय मार्गावर दररोज सरासरी 25 लाख 58 हजार 158 प्रवासी प्रवास करत होते. नोव्हेंबरमध्ये हीच संख्या सरासरी 23 लाख 20 हजार होती. शनिवार 1 जानेवारी 2022 ला सध्या 22 लाख 38 हजार असून 3 जानेवारीला मात्र 41 लाख 45 हजार असल्याची नोंद झाली आहे. पश्‍चिम रेल्वेकडूनही दररोजची उपनगरीय प्रवासी संख्येची माहिती दिली असता, नोव्हेंबर 2021 मध्ये सरासरी 19 लाख 10 हजार असलेली प्रवासी संख्या डिसेंबर 2021 मध्ये 20 लाख 21 हजार 615 झाली. जानेवारीत सध्या 21 लाख 73 हजार प्रवासी प्रवास करत असल्याचे सांगण्यात आले.

अद्याप बर्‍याच जणांनी लस घेतलेली नाही त्यांनी लस घेतलीच पाहिजे. ज्यांची तारीख ओलांडल्या गेली आहे आणि दुसरा डोस घेण्याची आवश्यकता आहे, त्यांनी देखील दुसरा डोस घेतला पाहिजे.
राजेश टोपे, आरोग्यमंत्री, महाराष्ट्र शासन.

Exit mobile version