अर्बन स्पोर्ट टर्फवर मनोरंजनाची मेजवानी; वियोम फाऊंडेशनचा दमदार विजय
| मुंबई | प्रतिनिधी |
दादरच्या शिवाजी पार्क परिसरातील पार्क क्लबच्या अर्बन स्पोर्ट टर्फवर महापौर चषक इनडोअर क्रिकेट स्पर्धेची सुरूवात झाली आहे. या स्पर्धेने पहिल्याच दिवशी क्रिकेटप्रेमींना थरार, वेग आणि भन्नाट मनोरंजनाची मेजवानी दिली. महामुंबई इनडोअर क्रिकेट स्पोर्ट्स असो.च्यावतीने आयोजित या स्पर्धेचे उद्घाटन आ. सुनील शिंदे व माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्या हस्ते पार पडले.
यावेळी पार्क क्लबच्या कार्याध्यक्षा वरदा चुरी, मुंबई महिला क्रिकेटचे माजी अध्यक्ष दत्तात्रय वेदक, वियोम फाऊंडेशनच्या अध्यक्षा विनया तोरसकर, महाइनडोअर क्रिकेट असो.चे संस्थापक चेअरमन क्षितिज वेदक आणि संस्थापक सचिव बाळासाहेब तोरसकर यांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडले. इनडोअर क्रिकेटमध्ये एका वेळी मैदानावर 8 खेळाडू खेळतात. प्रत्येक जोडीला 2 षटके फलंदाजी करावी लागते, तर प्रत्येक खेळाडूला 1 षटक गोलंदाजी करणे बंधनकारक असते. विशेष म्हणजे, फलंदाज बाद झाल्यास संघाच्या खात्यातून 5 धावा वजा होतात. त्यामुळे प्रत्येक चेंडूवर सामना रंगतदार होताना दिसला.
प्रथम फलंदाजी करताना मीडिया टिमच्या अंकुश धावरे (15-5= 10 धावा) व किरण महनवर (11-5= 6 धावा) यांनी 16 धावांची पायाभरणी केली. त्यावेळी रोहन व ओमकारने दोन्ही फलंदाजांना 1-1 वेळा बाद केले. दुसऱ्या जोडीतील सिद्धेश कानसे (12-5= 7 धावा) व निकुंज नाटेकर (7-10= -3 धावा) यांना फक्त 4 धावांचीच भर घालता आली. यावेळी कुशने दोन्ही फलंदाजांना 1-1 वेळा बाद केले. तर, प्रसादाने निकुंजला एकदा बाद केले. तिसऱ्या जोडीतील अतुल लोके (12-5= 7 धावा) व अन्वय सावंत (10-5= 5 धावा) यांनी 12 धावांची भर घातली. यावेळी अजितने दोन्ही फलंदाजांना 1-1 वेळा बाद केले. तर, शेवटच्या जोडीतील गणेश पुराणिक (6 धावा) व कर्णधार रोहित नाईक (9-5=4 धावा) यांना आणखी 10 धावा केल्याने संघाला 42 धावांपर्यंत मजल मारता आली.
43 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना वियोम फाऊंडेशनची सुरुवात डळमळीत झाली. पहिल्या जोडीने श्रेयस वैद्य (9-10= -1 धावा) व खुश शहा (11-5= 6 धावा) अश्या 5 धावाच करता आल्या. गणेशने श्रेयसला एकदा तर सिद्धेशने दोन्ही फलंदाजांना 1-1 वेळा बाद केले. दुसऱ्या जोडीतील रोहन गावडे (15-5= 10 धावा) व अजित सेठी (10 धावा) यांनी दमदार भागीदारी करत 20 धावा केल्या. यातील रोहनला अन्वयने एकदा बाद केले तर निकुंजला कोणालाही बड करण्यात यश मिळाले नाही. तिसऱ्या जोडीतील अनिकेत माडीये (18 धावा) व प्रसाद आंब्रे (14 धावा) यांनी अंकुश व अतुलच्या गोलंदाजीवर तब्बल 32 धावा कुटल्या व संघाला भक्कम केले. तर चौथ्या व शेवटच्या जोडीतील कर्णधार ओमकार पाटोळे (18-5= 13 धावा) व सुभम गुरव (12 धावा) यांनी 25 धावांची भागीदारी करत संघाला 82 धावांपर्यंत नेले आणि 40 धावांनी शानदार विजय मिळवून दिला.
