रेकी केल्याची कबूली
मुंबई | प्रतिनिधी |
दिल्ली पोलिसांनी अटक केलेल्या 6 दहशतवाद्यांसंदर्भात एक मोठा खुलासा झाला आहे. मुंबई लोकल पुन्हा एकदा दहशतवाद्यांच्या निशाण्यावर आली आहे. दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा मुंबई लोकलवर निशाणा साधण्याचा कट रचला होता. त्यांनी मुंबई लोकलची रेकी केली होती. असी धक्कादायक माहिती समोर येत आहे. तसेच घातपाताचा कट यशस्वी करण्यासाठी त्यांनी राज्यातील अनेक महत्त्वाची ठिकाणंही दहशतवाद्यांच्या निशाण्यावर असल्याची माहिती मिळत आहे. तसेच हा कट यशस्वी करण्यासाठी अनेक ठिकाणी विस्फोटकं पोहोचवण्यात आली आहेत, असं दिल्ली पोलिसांच्या तपासात उघड झालं आहे.
दिल्ली पोलिसांनी ज्या सहा दहशतवाद्यांना ताब्यात घेतलं, त्यांची चौकशी सुरु आहेत. चौकशी दरम्यान, एका दहशतवाद्यानं सांगितलं की, आम्ही मुंबई लोकलची संपूर्ण रेकी केली होती. यापूर्वी मुंबई लोकल अनेकदा दहशतवाद्यांच्या निशाण्यावर आली आहे. मुंबई लोकलमध्ये यापूर्वी सीरिअल बॉम्बस्फोट झाले आहेत. त्यामुळे दहशतवाद्यांचा मुंबई लोकलची रेकी करण्यामागे नक्की काय हेतू होता? याबाबत तपासयंत्रणा आणखी तपास करत आहेत.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांनी अनेक महत्त्वाच्या ठिकाणी स्फोटकं लपवली आहेत. त्यापैकी काही स्फोटकं तपासयंत्रणांनी हस्तगत केली आहेत. दिल्ली पोलिसांनी अटक केलेल्या दहशतवाद्यांपैकी एक दहशतवादी मुंबईत वास्तव्यास होता. मुंबईतील सायन परिसरात जान मोहम्मद अली शेख हा वास्तव्यास होता. त्याच्यासोबत त्याची पत्नी आणि दोन मुली असे चौघेजण धारावीतील घरात राहत होते. जान मोहम्मद हा पेशानं ड्रायव्हर होता. त्यामुळे मुंबईची रेकी करण्याची जबाबदारी जान मोहम्मदवर होती का? नेमका या कटात त्याचा कितपत सहभागी होता? याबाबत सध्या तपास सुरु आहे.
समोर आलेल्या धक्कादायक माहितीनुसार, जान महोम्मद अली शेख आणि त्याच्या साथीदारांना दाऊद इब्राहिमकडून रसद पुरवली जात होती. त्यामुळे जान महोम्मदचे आणखी कुणी साथीदार आहेत का? त्यांचा नेमका मनसुबा काय आहे? याचा छडा लावण्याचं तपास यंत्रणेसमोर आव्हान आहे.
मुंबई पोलिसांना स्वातंत्र्य
कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्हं उपस्थित करण्याआधी ज्या परिस्थितीतून आपण जात आहोत, त्या परिस्थितीत सर्वांनी पोलिसांना मदत करण्याची भूमिका घेतली पाहिजे. सरकारने काढलेल्या आदेशाच्या विरोधामध्ये आंदोलनं करण्यापेक्षा किंवा बाकीच्या काही गोष्टी करण्यापेक्षा सरकारला, पोलिसांना सहकार्य करण्याची भूमिका घेतली पाहिजे. पोलिसांना पूर्ण स्वातंत्र्य आहे. अजिबात त्यांना दुसर्या कोणत्या गोष्टींसाठी अडकून ठेवलेलं नाही., असं प्रत्युत्तर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आशिष शेलारांना दिलं आहे.
जान मोहम्मद दाऊदचा जुना खिलाडी
जान मोहम्मद शेखचे 20 वर्षांपासून दाऊद गँगशी संबंध असल्याचा खुलासा एटीएसने केला आहे. दिल्ली पोलिसांनी कारवाई करत एकूण 6 जणांना अटक केली असून त्यापैकी जान मोहम्मद शेख हा मुंबईच्या धारावी परिसरात राहणारा होता. त्यामुळे राज्यातील तपास यंत्रणांवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. यासंदर्भात एटीएस प्रमुख विनीत अगरवाल यांनी पत्रकार परिदेत महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे.
दिल्ली पोलिसांनी 6 लोकांना अटक केली आहे. त्यातला एक धारावीत राहणारा आहे. त्याचं नाव जान मोहम्मद अली मोहम्मद शेख आहे. याला फार जुनी गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. पाकिस्तानातील दाऊदच्या गँगसोबत संबंध असल्याचा त्याचा इतिहास आहे. मात्र, या प्रकरणाची माहिती आमच्याकडे नव्हती. ही माहिती दिल्ली पोलिसांना केंद्रीय एजन्सींनी दिली. 9 तारखेला त्यानं दिल्लीला जायचं नियोजन केलं. 10 तारखेला त्यानं पैसे देखील ट्रान्सफर केले. पण त्याचं तिकीट कन्फर्म होत नव्हतं. मग 13 तारखेला गोल्डन टेम्पल एक्सप्रेस ट्रेनसाठी त्यानं वेटिंग तिकीट घेतलं. संध्याकाळपर्यंत त्याचं तिकीट कन्फर्म झालं. तो एकटाच तिथून ट्रेनने निघाला. ट्रेन कोटाला पोहोचली, तेव्हा त्याला अटक करण्यात आली, असं एटीएसकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.
त्याच्याकडे कोणतीही स्फोटकं, शस्त्र नाही मिळाली. जी काही माहिती आहे, ती दिल्ली पोलिसांकडे आहे. आमचं एक पथक आज संध्याकाळी दिल्लीला जात आहे. जान मोहम्मदची चौकशी करेल. दिल्ली पोलीस आणि आमच्यात माहितीची देवाण-घेवाण होईल, असं देखील यावेळी सांगण्यात आलं.