शिवनेरी कबड्डी महोत्सवात मुंबई पोस्टलची बाजी

| मुंबई | प्रतिनिधी |

शिवनेरी कबड्डी महोत्सवाच्या व्यावसायिक गटाच्या अंतिम सामन्यात मुंबई पोस्टल संघाने वेस्टर्न रेल्वेचा 30-27 असा पराभव करत तीन गुणांनी विजेतेपद पटकावले.

कुमार गटाच्या अंतिम सामन्यात गुड मॉर्निंग स्पोर्ट्स क्लबने विजय क्लबवर सहा गुणांनी मात करत विजेतेपद मिळवले. विजेत्या संघाकडून निलेश मोरे याने चढाईत, तर आदित्य धुमाळ याने पकडीमध्ये प्रभावी कामगिरी केली. विजय क्लबकडून दिलीप गुप्ता आणि विजेंद्र यादव यांनी विजयासाठी प्रयत्न केले. मात्र, गुड मॉर्निंग स्पोर्ट्स क्लबने सरस खेळाच्या जोरावर जेतेपद पटकावले.

महिला गटाच्या अंतिम सामन्यात विवेक महिला संघाने शिवशक्ती महिला संघाचा 28-24 असा पराभव करत चार गुणांनी विजय मिळवला. विवेक संघाकडून तनू हिने चढाईत, तर हरजीत कौर हिने पकडीमध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले. शिवशक्ती संघाकडून अदिती शिंदे हिने चढाईत, तर पौर्णिमा जेधे हिने पकडीमध्ये चांगली कामगिरी केली. मात्र, विवेक महिला संघाने आघाडी कायम राखत विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. व्यावसायिक, कुमार आणि महिला गटांत अनुक्रमे मुंबई पोस्टल, गुड मॉर्निंग स्पोर्ट्स क्लब आणि विवेक महिला संघाने विजेतेपद पटकावले.

Exit mobile version