मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते विजेत्यांचा गौरव
| ठाणे | प्रतिनिधी |
येथील स्वर्गीय आनंद दिघे क्रीडानगरीत महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने व ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या यजमानपदाखाली विठ्ठल क्रीडा मंडळ व प्रशांत जाधवर फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने 50 वी सुवर्णमहोत्सवी मुख्यमंत्री चषक कुमार-कुमारी गट राज्य अजिंक्यपद निवड चाचणी स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी रात्री उशिरा झालेल्या अंतिम सामन्यात कुमार गटात मुंबई उपनगर पश्चिमने विजयासह स्व. नारायण नागू पाटील फिरत्या चषकावर आपले नाव कोरले. तर, उपविजयी पिंपरी चिंचवड ठरला. कुमारी गटात पिंपरी चिंचवड संघाने प्रथम क्रमांकासह सह क्रीडाशिक्षक स्व. चंदन सखाराम पांडे यांच्या स्मरणार्थ ठेवण्यात आलेल्या फिरत्या चषकावर आपले नाव कोरले. तर, पुणे ग्रामीण संघाने उपविजेतेपद पटकाविले.
या स्पर्धेचे पारितोषिक वितरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी स्पर्धा मार्गदर्शक हनुमंत जगदाळे, मुख्य आयोजक प्रशांत जाधवर, माजी नगरसेविका राधाबाई सुभाष जाधवर, महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशचे सरकार्यवाह बाबुराव चांदेरे, खजिनदार मंगलदास पांडे, ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष कृष्णा पाटील, कार्याध्यक्ष मनोज पाटील, सरकार्यवाह मालोजी भोसले, विठ्ठल क्रीडा मंडळाचे ॲड. किरण जाधव, सचिव संतोष पाटील यांच्यासह सर्व संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
कुमार गटात मुंबई उपनगर पश्चिम संघाने पिंपरी चिंचवड संघावर 27-15 अशी मात करीत विजय मिळविला, मध्यंतराला उपनगर पूर्व संघाकडे 10-8 अशी निसटती आघाडी होती. दोन्ही संघ तुल्यबळ असल्याने सुरुवातीपासूनच एकमेकांना अजमावत व सावध खेळ करीत होते. मात्र, मध्यंतरानंतर पिंपरी चिंचवडच्या संघाचा अनुभव कमी पडला व उपनगर पश्चिमचे आक्रमण थोपविण्यात आणि बचाव भेदण्यात यशस्वी झाले नाहीत. उपनगर पश्चिमच्या रजत सिंग व ओम कुडले यांनी सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ केला. त्यांनी पहिल्या डावात 2 बोनस गुण मिळविले, तर दुसऱ्या डावात 2 बोनस गुणांसह एक लोणाचे दोन गुण मिळविले. त्यांना दिनेश यादव यांनी चांगल्या पकडी घेतल्या. पिंपरी चिंचवडच्या देवेंद्र अक्षुमनी व ऋषिकुमार शर्मा यांनी सावध खेळ करीत उपनगर पश्चिमचा बचाव भेदण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यात त्यांना फारसे यश आले नाही. विक्रम पवारने काही चांगल्या पकडी घेतल्या.
कुमारी गटात पिंपरी चिंचवड संघाने पुणे ग्रामीण संघावर 44-27 अशी मात करीत स्पर्धेचे विजेतपद मिळविले. पुणे जिल्ह्याचे तीन विभाग झाल्यानंतर प्रथमच झालेल्या या स्पर्धेत पुणे जिल्ह्याने चांगली कामगिरी करीत स्पर्धेचे विजेत व उपविजेतेपद मिळविले. मध्यंतराला पिंपरी चिंचवड संघाकडे 30-8 अशी भक्कम आघाडी होती. पिंपरी चिंचवड संघाच्या मनिषा रोठोड व आर्या पाटील यांनी चौफेर चढाया करीत पुणे ग्रामीण संघावर सहज विजय मिळविला. पिंपरी चिंचवडच्या सिफा वस्ताद व भूमिका गोरे यांनी चांगल्या पकडी घेत विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. मनिषा राठोड व आर्या पाटील यांनी 9 बोनस गुण मिळविले. तर दोन लोण लावत चार गुणदेखील मिळविले. पुणे ग्रामीणच्या साक्षी रावडे व झवेरिया पिंजारी यांनी चांगला प्रतिकार केला. मात्र, त्यांना मनिषा राठोडचे आक्रमण थांबविता आले नाही. श्रुती मोरे हिने सुरेख पकडी घेतल्या. पुणे ग्रामीण संघाच्या साक्षी रावडे व झवेरिया पिंजारी यांनी 4 बोनससह एक लोणाचे 2 गुण मिळविले. दरम्यान, कुमार गटात तृतीय क्रमांक- पुणे ग्रामीण तर चतुर्थ क्रमांक- नंदुरबार यांनी पटकाविला. तर, कुमारी गटात तृतीय क्रमांक- मुंबई उपनगर पूर्व, तर चतुर्थ क्रमांक- कोल्हापूर जिल्हा यांनी प्राप्त केला.
