दोन पराभवानंतर हार्दिकने घेतला ब्रेक
| मुंबई | प्रतिनिधी |
मुंबई इंडियन्सच्या टीम मॅनेजमेंटने संघाचा कर्णधार बदलण्याचा निर्णय घेत नेतृ्त्त्वाची धुरा रोहित शर्मा ऐवजी हार्दिक पांड्याकडे दिली आहे. मात्र, हार्दिक पांड्याला यंदाचे आयपीएल चांगले गेलेले नाही. एकीकडे क्रिकेट फॅन्सकडून होणारी टीका आणि दुसरीकडे मुंबई इंडियन्सचे दोन जिव्हारी लागणाऱ्या पराभवचा सामना हार्दिक पांड्याने केला आहे. दरम्यान, हार्दिक पांड्याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. हार्दिक पांड्याने हैदराबाद विरुद्धच्या मॅचनंतर ब्रेक घेतला असल्याची माहिती समोर आली आहे. मुंबईची पुढील मॅच 1 एप्रिल रोजी राजस्थान रॉयल्स विरुद्ध होणार आहे.
हार्दिक पांड्या मुंबईचा कर्णधार झाला तेव्हापासून त्याला टीकेचा सामना करावा लागत आहे. रोहित शर्माच्या जागी हार्दिककडे नेतृत्त्व देण्यात आलं होतं. रोहित शर्माचे चाहते हार्दिक पांड्यावर टीका करताना दिसून आले आहेत. याशिवाय गुजरात टायटन्सच्या समर्थक प्रेक्षकांनी देखील अहमदाबादमध्ये हार्दिक पांड्या विरोधात नारेबाजी केली होती. दरम्यान, सनरायजर्स हैदराबादच्या विरोधातील सामन्यानंतर मुंबईचा संघ दिल्लीत परतल्यानंतर हार्दिक पांड्या लगेचच त्याच्या मुंबईतील घरी निघून गेला आहे. हार्दिक पांड्या पुन्हा आराम करुन राजस्थान विरुद्धच्या मॅचसाठी तयार होईल. तसेच, त्यानं संघासोबत राहण्याऐवजी कुटुंबीयांसोबत वेळ घालवण्यासाठी ब्रेक घेतल्याची माहिती आहे.