बेकायदा जाहिरात फलकांविरोधात महापालिकेची कारवाई

| पनवेल | प्रतिनिधी ।

महापालिकेची पूर्वपरवानगी न घेता कामोठे परिसरात जाहिरातींचे व डिजिटल फलक लावणाऱ्या सात आस्थापनांविरोधात पनवेल महापालिकेने फौजदारी कारवाई केली आहे. प्रशासनाने वारंवार सूचना करूनही विनापरवानगी जाहिरात फलक लावल्याचे निदर्शनास आल्यानंतर अतिक्रमण नियंत्रण विभागाने कामोठे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

प्रभाग समिती ‘क’च्या हद्दीत कामोठे परिसराचा समावेश असून, शहरात जाहिरात किंवा डिजिटल फलक उभारण्यासाठी महापालिकेची परवानगी घेणे बंधनकारक आहे. याबाबत महापालिकेने प्रसिद्धिपत्रकाद्वारे नागरिक तसेच व्यावसायिकांना यापूर्वीच सूचना दिल्या होत्या. महापालिकेच्या पथकाने 14 ऑगस्ट ते 9 सप्टेंबरदरम्यान कामोठे परिसरात पाहणी केली. यावेळी विस्टा कॉर्नर तसेच एल.जी. शोरूम ते मानसरोवर रेल्वेस्थानकाकडे जाणाऱ्या मार्गावरील दुभाजक आणि रस्त्याच्या कडेला काही जाहिरात फलक विनापरवानगी उभारण्यात आल्याचे आढळले. त्यानंतर अतिक्रमण नियंत्रण पथकाने संबंधित फलक हटविले. तसेच सात आस्थापनांविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. विनापरवानगी जाहिरात फलक उभारणाऱ्यांविरोधात यापुढेही कारवाई सुरूच राहणार असल्याचे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

Exit mobile version