महानगरपालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाचा बडगा

गेल्या चार दिवसात पनवेलमध्ये मोठी कारवाई; अतिक्रमण विभागाकडून दंडात्मक रक्कम वसूल

| पनवेल | प्रतिनिधी |

पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील रस्ते आणि फुटपाथ मोकळे ठेवण्यासाठी पालिका प्रशासनाने आयुक्त मंगेश चितळे यांच्या सुचनेनुसार अतिक्रमण विरोधी मोहीम अधिक तीव्र केली आहे. दरम्यान, गेल्या चार दिवसांपासून महानगरपालिकेच्या प्रभाग समिती ‘ड’ पनवेलच्या माध्यमातून अतिक्रमण विभागाने शहरातील अनधिकृत हातगाड्या, अनधिकृत फळे-भाजी विक्री व्यवसाय धारकांवर मोठी कारवाई करण्यात आली. 1 ते 4 ऑक्टोबर 2026 या चार दिवसांत करण्यात आलेल्या कारवाईत एकूण 2 लाख 7 हजार 500 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तसेच पालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या वतीने पनवेल, कळंबोली, खारघर, कामोठे आणि प्रभाग उपविभाग नावडे या परिसरात विनापरवाना व अनधिकृतपणे थाटलेल्या दुकानांवर आणि फेरीवाल्यांवर धडक दंडात्मक कारवाई करण्यात आली.

कळंबोली परिसरातील सेंट जोसेफ शाळेसमोर विद्यार्थ्यांची व पालकांची मोठी वर्दळ असते, फुटपाथवरील अतिक्रमणामुळे नागरिकांना रस्त्यावरून चालावे लागत होते. त्यामुळे फुटपाथवर अनधिकृतपणे थाटलेल्या स्टॉल्सवर पालिका कर्मचाऱ्यांनी थेट कारवाई केली. या मार्गावर तसेच, परिसरातील नर्सरी चालकांना प्रशासनाकडून अंतिम इशारा देण्यात आला असून त्यांनी विक्रीसाठी रस्त्यावर ठेवलेली झाडे तात्काळ हटवण्यात आली आहेत. प्रभाग समिती ‘क’ कामोठे अंतर्गत दिनांक 03 ऑक्टोबर 2026 रोजी विशेष मोहीम राबवून अतिक्रमण हटवण्यात आले व मोठा दंड वसूल करण्यात आला. यामध्ये प्रभाग समिती ‘क’ मार्फत कामोठे परिसरात अतिक्रमण विभागाकडून करण्यात आलेल्या कारवाईत एकूण 28 हजार इतकी दंडात्मक रक्कम वसूल करण्यात आली. नावडे परिसरात अनधिकृत व्यवसाय करणाऱ्या हातगाड्या, अनधिकृत फळे व भाज्यां विक्री व्यवसाय धारकांवर दंडात्मक कारवाईच्या माध्यमातून शनिवारी 12 हजार इतका दंड वसूल करण्यात आला.

पनवेल, कामोठे आणि नावडे उपविभागांतून आतापर्यंत एकूण 2 लाख 47 हजार इतका दंड पालिकेच्या तिजोरीत जमा झाला आहे. पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील मुख्य रस्ते, शाळांचे परिसर आणि सार्वजनिक जागा अतिक्रमणमुक्त करण्यासाठी ही धडक मोहीम यापुढेही अशीच सुरू राहील, असा इशारा प्रशासनाच्या वतीने देण्यात आला आहे. नागरिक आणि स्थानिक व्यापाऱ्यांनी सार्वजनिक जागांवर अनधिकृतपणे सामान ठेवून वाहतुकीस अथवा पादचाऱ्यांना अडथळा निर्माण करू नये, असे आवाहन अतिरिक्त आयुक्त महेश कुमार मेघमाळे यांनी पालिकेच्या वतीने केले आहे.

अनधिकृत खाद्यपदार्थ विक्रेत्यांवर कारवाई
खारघर क्षेत्रातही अनधिकृतपणे चालणाऱ्या खाद्यपदार्थ विक्रेत्यांवर पालिका पथकाने कारवाईचा बडगा उभारला. रस्त्याच्याकडेला आणि दुकानांच्या बाहेरील मोकळ्या जागेत अनधिकृतपणे साहित्य ठेवून अतिक्रमण करणाऱ्या दुकानदारांचे सामान जप्त करण्यात आले. व्यापाऱ्यांनी दुकानाची हद्द ओलांडून बाहेर ठेवलेले सामान अतिक्रमण विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ जप्त केले.
Exit mobile version