। अलिबाग । प्रतिनिधी ।
उरण, कर्जत, खोपोली नगर परिषदेमधील कंत्राटी कामगार मंगळवारी एकत्र आले. त्यांनी त्यांच्या प्रलंबित मागण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरु केले आहे. या उपोषणाला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. मात्र प्रशासनाकडून दखल घेतली जात नसल्याने तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. सकारात्मक चर्चेतून कार्यवाही करण्याची सुचना देऊनही त्याची अंमलबजावणी झाली नसल्याने कंत्राटी कर्मचार्यांनी मंगळवारी (दि. 22) आमरण उपोषण सुरु केले आहे.

किमान वेतन कायद्यानुसार किमान वेतन मिळाले पाहिजे. कायद्यातील तरतूदीनुसार, भविष्य निर्वाह निधीची रक्कम दर महिन्याला भरणे आवश्यक आहे. दैनंदिन कामे करताना आवश्यक गणवेश, रेनकोट, गमबुटांसह इतर साधन सामुग्री मिळावी. बोनसची रक्कम वेळेवर मिळावी अशा अनेक मागण्यांबरोबरच खोपोली, कर्जत, उरण या तिन्ही नगर परिषदांमध्ये कंत्राटी सफाई कामगारांना न्याय न देण्याच्या नकारार्थी भुमिकेविरोधात लढा सुरु केला आहे. आयुक्त तथा संचालक, नगरपालिका प्रशासन संचालयानाने निर्गमित केलेल्या परिपत्रकांचा अवमान करणार्या अधिकारी व कर्मचारी यांच्याविरोधात शिस्तभंगाची कारवाई न केल्याने आमरण उपोषण सुरु केले आहे. म्युनिसिपल एम्लॉईज युनियनच्या वीतने हे उपोषण सुरु केले आहे.
जयंत पाटील यांनी घेतली भेट
शेकाप सरचिटणीस जयंत पाटील यांनी मंगळवारी दुपारी नगरपरिषद कंत्राटी कर्मचारी यांची सदिच्छा भेट घेतली. त्यांचे गार्हाणे ऐकून घेतले. यावेळी उपोषण कर्ते कर्मचार्यांनी निवेदन दिले. दरम्यान त्यांचे म्हणणे ऐकून घेऊन तुमची मागणी रास्त आहे. याबाबत शासनाला जाब विचारून न्याय देण्याचा प्रयत्न केला जाईल असे आश्वासन देण्यात आले.