| मुरुड-जंजिरा | प्रतिनिधी |
मुरुड समुद्रकिनारी अनेक टपरीधारक आहेत. या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांना न्याहारी व भोजन व्यवस्था, तसेच चहा व्यवस्था येथूनच मिळत असते. परंतु, याठिकाणी व्यवसाय करण्याचे प्रमाण अधिक वाढल्याने जो तो समुद्रकिनारी रस्त्याच्या कडेला हातगाडी टाकून व्यवसाय करू लागला आहे. त्यामध्ये काही हातगाडी व टपरीधारकांना मुरुड नगरपरिषद परवानगी असून, काही गाड्या अनधिकृतपणे लावण्यात आल्याची माहिती मुरुड नगरपरिषदेकडून कृषीवलच्या प्रतिनिधीला देण्यात आली. दरम्यान, नागरिकांच्या आलेल्या तक्रारीनुसार मुरुड नगरपरिषदेने समुद्रकिनाऱ्यावर असणाऱ्या दोन गाड्या ताब्यात घेण्यात आल्या आहेत. त्यातील एका गाडीवर रेखा कंटक या स्प्रिंग पोटॅटो विकत होत्या. तर, दुसरी हातगाडी ही चार वर्षापासून बंद असून, संबंधित मालकाने कोणतीही परवानगी घेतलेली नाही. ही गाडी अगदी प्रवेशद्वाराजवळ ठेवण्यात आली होती. त्यामुळे पर्यटक व स्थानिक नागरिकांना ये-जा करताना अडचण होत होती. या दोन्ही गाड्या नगरपरिषदेने ताब्यात घेतल्या आहेत. मुरुड नगरपरिषदेच्या या धडक कार्यवाहीने हातगाडीवाले चांगलेच धास्तावले आहेत.







