। मुंबई । प्रतिनिधी ।
राज्याचे लक्ष लागलेल्या महानगरपालिका निवडणुकीचे बिगुल अखेर वाजले आहे. राज्य निवडणूक आयोगाने सोमवारी (दि.15) पत्रकार परिषद घेत राज्यातील महापालिकांच्या निवडणुकींची मोठी घोषणा केली आहे. मुंबई, ठाण्यासह राज्यातील 29 महानगर पालिकांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. या सर्व महापालिकांसांठी 15 जानेवारीला मतदान पार पडणार आहे, तर 16 जानेवारीला निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे, अशी माहिती राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिली आहे.
गेल्या काही महिन्यांपासून राजकीय आरोप-प्रत्यारोप, न्यायलयीन लढा आणि सरतेशेवटी 31 जानेवारीच्या अंतिम मुदतीचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. त्यामुळे चर्चेत असलेल्या राज्यातील महानगरपालिकांच्या निवडणुका सोमवारी अखेर राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केल्या आहेत. सोमवारी झालेल्या पत्रकार परिषदेत राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी सांगितले की, मुदत संपलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 31 जानेवारी 2026 पर्यंत घेण्यासाठी करण्यात आलेल्या कार्यवाहीची माहिती देण्यासाठी ही परिषद घेण्यात येत आहे. महाराष्ट्र राज्यातील 29 महापालिका निवडणुकीच्या संदर्भात ही पत्रकार परिषद असून 29 पैकी 27 महापालिकेची मुदत संपलेली आहे. त्यातील 5 महापालिकेची मुदत 2020 मध्ये, मुंबईसह 18 महापालिकांची मुदत 2022 मध्ये, तर 4 महापालिकांची मुदत ही 2023 मध्ये संपलेली आहे. तसेच, राज्यातील 29 महानगरपालिका क्षेत्रात सोमवारपासून निवडणुकीची आचारसंहिता लागू होणार असल्याची माहिती देखील निवडणूक आयुक्तांनी दिली.
असा असेल निवडणूक कार्यक्रम
23 ते 30 डिसेंबर - नामनिर्देशन पत्र स्वीकारण्याचा कालावधी
31 डिसेंबर - नामनिर्देशन पत्र छाननी
2 जानेवारी - उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत
3 जानेवारी - निवडणूक चिन्ह वाटप आणि अंतिम उमेदवार यादी
15 जानेवारी - मतदान
16 जानेवारी - निवडणूक निकाल
दुबार मतदारांना रोखण्यासाठी उपाययोजना
दुबार मतदारांना रोखण्यासाठी केलेल्या उपाययोजनांबाबत बोलताना राज्य निवडणूक आयुक्तांनी सांगितले की, या निवडणुकीसाठी संभाव्य दुबार मतदाराची ओळख केलेली आहे. संभाव्य दुबार मतदारांच्या नावासमोर ‘डबल स्टार' असे मार्क करण्यात आले आहे. या मतदारांच्या संदर्भात महापालिका आयुक्तांच्या मार्फत संभाव्य दुबार मतदारांच्या घरी जाऊन सर्वेक्षण करण्यात आले आहे. तसेच, दुबार मतदारांना विचारून तो कुठल्या मतदान केंद्रावर मत देईल, हे लिहून घेण्यात आले आहे. त्या मतदान केंद्राव्यतिरिक्त त्याला इतर कुठेही मतदान करू दिले जाणार नाही, असे राज्य निवडणूक आयुक्तांनी स्पष्ट केले.







