। नेरळ । प्रतिनिधी ।
कर्जत शहरातील गणेश विसर्जन उल्हासनदीवर ज्या-ज्या गणेश घाटांवर केले जाते, तेथील सोयी-सुविधांचा पाहणी आणि अत्यावश्यक सेवांची माहिती घेण्यासाठी कर्जत नगरपरिषदेकडून पाहणी करण्यात आली.
कर्जत शहरातील गणेशाचे विसर्जन उल्हासनदी पात्रात वाहत्या पाण्यात केले जाते. गौरी गणपती तसेच अनंत चतुर्दशीच्या गणपती बाप्पांना निरोप देण्यासाठी येणार्या बाप्पावर पालिकेकडून शामियाना उभारून पुष्पवृष्टी केली जाते. उल्हासनदीच्या तीरावर वसलेल्या कर्जत शहरात अनेक ठिकाणी गणेश विसर्जन केले जाते. तेथील महावीर पेठ तसेच आमराई दहिवली येथील गणेश विसर्जन घाटांवर भक्तांची होणारी गर्दी लक्षात घेऊन कोणत्याही गैरसोयी होऊ नये यासाठी नगरपरिषदेकडून नियोजन केले जाते. गतवर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कर्जत शहरातील गणेश विसर्जन वादात सापडले होते. आता त्या चुका होऊ नये यासाठी कर्जत नगरपरिषदेकडून शहरातील कर्जत, दहिवली, मुद्रे, गुंडगे येथील गणेश विसर्जन घाटांची पाहणी नगराध्यक्षा सुवर्णा जोशी, उपनगराध्यक्ष अशोक ओसवाल आणि मुख्याधिकारी डॉ.पंकज पाटील यांनी केली. या पदाधिकारी वर्गासोबत नगरपरिषदचे आरोग्य निरीक्षक सुदाम म्हसे, विद्युत अभियंता लाड तसेच नगर अभियंता मनीष गायकवाड आदी सोबत होते.