| नवी मुंबई | प्रतिनिधी |
नवी मुंबई महानगर पालिकेचे अधिकारी मनोहर गांगुर्डे यांनी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना शनिवारी समोर आली असून, कामोठे पोलीस अधिक तपास करीत आहेत.
नवी मुंबई महानगर पालिकेच्या ऐरोली विभाग कार्यालयात प्रशासन अधिकारी म्हणून मनोहर गांगुर्डे हे कार्यरत होते. ते स्वतः कामोठे सेक्टर 16 येथील प्रेमअंबर सोसायटीत राहात होते. त्यांनी शुक्रवारी अपरात्री याच ठिकाणी गळफास घेत आत्महत्या केली आहे. ते दरवाजा उघडत नसल्याचे समोर आल्यावर या बाबत शेजार्यांनी पोलिसांना माहिती दिल्यावर पोलिसांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केल्यावर त्यांनी गळफास घेतल्याचे दिसून आले. त्यांना गृहकर्जाची नोटीस आल्याचे आढळून आले. त्यामुळे आर्थिक विवंचनेतून त्यांनी आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज कामोठे पोलिसांनी व्यक्त केला आहे. सदर आत्महत्या घटनेची नोंद शनिवारी करण्यात आली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रियांका खरटमल या करीत आहेत. तर गेल्या काही दिवसापासून ते फार कोणाशी बोलत नव्हते. त्यांच्या आत्महत्येबाबत समाज माध्यमातून माहिती मिळाली, अशी माहिती मनपा अधिकार्यांनी दिली