शेकडो बेघरांची गैरसोय होणार दूर
| पनवेल | विशेष प्रतिनिधी |
पालिका हद्दीतील निराश्रित बेघरांसाठी पालिकेच्या माध्यमातून लवकरच निवारा केंद्र सुरु केले जाणार आहे. हे निवारा केंद्र सुरु करण्यासाठी खांदा वसाहतीमधील आसूड गाव येथील जागा निश्चित करण्यात आली आहे. या ठिकाणी जवळपास 100 निराश्रित नागरिकांची सोय होणार असून, निवारकेंद्रात राहण्याची तसेच जेवणाची सुविधा उपलब्ध असणार आहे.
रस्त्यावर किंवा पुलाखाली राहणार्या बेघर, निराश्रित नागरिकांचे जीवन सुसह्य व्हावे याकरिता शासनाकडून दीनदयाल राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानांतर्गत नागरी बेघर निवारा केंद्र या सामाजिक योजनेची सुरुवात करण्यात आली आहे. पालिका हद्दीत ही योजना राबवण्याचा निर्णय पालिका प्रशासनाकडून घेण्यात आला आहे. सुरुवातीला खासगी संस्थेच्या माध्यमातून निवारा केंद्र चालवण्यात येणार असल्याने पालिकेकडून मागवण्यात आलेल्या स्वारस्य अभिव्यक्तीला प्रतिसाद देत तीन संस्थांनी हे केंद्र चालवण्याची इच्छा पालिकेकडे दर्शवली आहे. तीनपैकी कोणत्या संस्थेला हे केंद्र चालवण्यास द्यायचे, याची चाचपणी पालिका प्रशासन करणार आहे. त्यानंतर याबाबत निर्णय घेणार आहे.
निवारा केंद्र सुरु करण्यासाठी आसुड गाव येथील मालमत्ता विभागाची दुमजली इमारत निश्चित करण्यात आली आहे. पाच हजार चौरस फूट जागा असलेल्या या इमारतीच्या तळमजल्यावर पालिकेचे प्राथमिक आरोग्य केंद्र सुरु करण्यात येणार आहे. तर, पहिल्या मजल्यावर जवळपास 100 निराधारांची राहण्याची सोय होणार असल्याची माहिती पालिकेचे उपायुक्त बाबासाहेब राजळे यांनी दिली आहे.
जेवणाची आणि नाशत्याची सोय
मालमत्ता विभागाच्या इमारतीच्या भाड्यापोटी लागणारी रक्कम पालिकेच्या तिजोरीतून देण्यात येणार आहे. तसेच बेघरांना लागणारे बेड, अंथरूण पांघरून सुरुवातीला पालिका उपलब्ध करून देणार आहे. निवारा केंद्रात दोन वेळच जेवण, चहा-नाश्ता तसेचा निवारा केंद्राच्या देखभालीचा खर्च संस्थेने करायचा आहे.
पालिका हद्दीत शेकडो बेघर
पालिका हद्दीतील बेघरांचे सर्वेक्षण पालिकेच्या माध्यमातून करण्यात येते. पालिकेच्या माध्यमातून काही वर्षांपूर्वी करण्यात आलेल्या सर्वेक्षणात पालिका हद्दीत 169 पेक्षा जास्त बेघरांची नोंद करण्यात आली होती. आता या संख्येत वाढ झाली असण्याची शक्यता आहे.