14 हजार पथदिव्यांचे हस्तांतरण
। पनवेल । विशेष प्रतिनिधी ।
सिडको हद्दीतील 14 हजार पथदिव्यांचे पालिकेकडे हस्तांतरण करण्यात आले आहे. हस्तांतरण होताच 14 हजार पथदिव्यांपैकी बंद असलेले सुमारे 4 हजार पथदिवे सुरु करण्यात पालिकेच्या विद्युत विभागाला यश आले आहे. विद्युत विभागाच्या प्रयत्नामुळे अंधारात गेलेले सिडको हद्दीतील काही रस्ते पुन्हा उजळवण्यात आल्याने नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
पालिकेत समाविष्ठ सिडको वसाहतींमध्ये सिडको तर्फे जवळपास 14 हजार पाथदिवे बसवण्यात आले आहेत. पालिकेत समावेशन झाल्यानंतरीही या पथदिव्यांची देखभाल व दुरुस्तीचे काम सिडकोने नेमलेल्या कंत्राट द्वारा केले जात होते. मात्र सप्टेंबर महिन्यात सिडकोने या पथदिव्यांची देखभाल आणि दुरुस्ती करण्याच्या कामाबाबत हात वरती केले. बंद असलेले दिवे दुरुस्त न करताच सिडकोने पथदिवे पालिकेकडे हस्तानंतरीत केल्याने बंद असलेले दिवे पुन्हा सुरु करण्याचे काम पालिकेकडून करण्यात आले असून, जवळपास 4 हजार बंद पथदिवे सुरु करण्यास पालिकेला यश आल्याची माहिती विद्युत विभाग प्रमुख प्रीतम पाटील यांनी दिली आहे.
14 हजार पथदिवे एलईडीने उजळणार
सिडको कडून हस्तांतरित करण्यात आलेले 14 हजार पथदिवे एलईडी दिव्यांनी उजळवण्याचा निर्णय विद्युत विभागाकडून घेण्यात आला आहे. या करिता निविदा प्रक्रिया राबवण्यात आली असून, जवळपास 17 ते 18 कोटी रुपये खर्च या करिता केला जाणार आहे.
चार नोड करिता चार अभियंते
नागरिकांच्या तक्रारीची तात्काळ दखल घेता यावी या करिता विद्युत विभागाने चार नोड मध्ये चार अभियांत्याची नेमणूक केली आहे. विद्युत विभागाचे हे अभियंते तक्रारिंची तात्काळ दखल घेत असल्याने पालिकेच्या या कामा बाबत नागरिक समाधान व्यक्त करत आहेत.
ग्रामीण भागात 3 हजारा वर पोल व पथदिवे
पालिकेच्या विद्युत विभागा मार्फत या पूर्वी ग्रामीण भागात 3300 विद्युत पोल उभारण्यात आले आहेत. तर पालिकेत समाविष्ठ ग्रामीण भाग तसेच पनवेल शहर अंतर्गत येणार्या 10 हजार पथदिवे एलईडी दिव्यात बदलवण्यात आले आहेत.
कामोठे वसाहती मधील जवळपास 100 पथ दिवे बंद असल्याची तक्रार विद्युत विभागाकडे केली होती. विभागाच्या कर्मचार्यांनी या तक्रारीची दखल घेत बंद दिवे तात्काळ सुरु करून दिले. सिडको कडे या करता वारंवार पाठपुरावा लागत होता.
संतोष चिखलेकर
उपाध्यक्ष राष्ट्रीय कॉग्रेस पक्ष, पनवेल