सोशल मीडियावरील टीकेनंतर पालिकेला जाग

नवीन पनवेलमध्ये बसवला नवा पंप

| खांदा कॉलनी | प्रतिनिधी |

सतत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे नवीन पनवेल येथील सेक्टर 13 परिसर शनिवारी (दि.4) पाण्याखाली गेला होता. त्यामुळे अनेक घरांमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने नागरिकांची मोठी गैरसोय झाली होती. परिसरातील जलनिस्सारण व्यवस्था कोलमडल्याने नागरिकांनी सोशल मीडियावर तीव्र नाराजी व्यक्त करत पालिका प्रशासनावर टीकेची झोड उठवली होती.

स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, दत्त मंदिर तसेच सेक्टर 13 परिसरातील महापालिकेचे पाणी उपसणारे पंप बंद अवस्थेत होते. त्यामुळे साचलेल्या पाण्याचा निचरा होऊ शकला नाही. केवळ काली माता मंदिर परिसरातील एकच पंप सुरू असल्याने परिस्थिती अधिकच गंभीर बनली होती. त्यामुळे आपत्ती व्यवस्थापनाच्या तयारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत पावसाळ्यापूर्वी गटारी व जलनिस्सारण यंत्रणेची योग्य साफसफाई झाली होती का, असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला होता. या घटनेचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर महापालिका प्रशासनाची धावपळ सुरू झाली. पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी सेक्टर 13 परिसराची पाहणी करून बंद पडलेला पंप तातडीने बदलून नवीन पंप बसविला. तसेच, पंप सुरळीत कार्यरत राहण्यासाठी आवश्यक असलेला नवीन फ्लोट बॉल देखील बसविण्यात आला. त्यामुळे साचलेल्या पाण्याचा निचरा करण्याचे काम पुन्हा सुरू झाले. दरम्यान, केवळ आपत्कालीन परिस्थितीत उपाययोजना करण्याऐवजी पावसाळ्यापूर्वीच पंपांची नियमित देखभाल, गटारींची साफसफाई आणि जलनिस्सारण यंत्रणा सक्षम करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. आपत्ती घडल्यानंतर नव्हे, तर ती टाळण्यासाठी नियोजनबद्ध उपाययोजना करणे हीच महापालिकेची खरी जबाबदारी असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.

Exit mobile version