पालिकेची नालेसफाई कुचकामी

काढण्यात आलेला गाळ अद्यापही रस्त्यावर

| पनवेल | विशेष प्रतिनिधी |

दरवर्षाच्या तुलनेत पालिका हद्दीत नालेसफाईच्या कामाला वेळेत सुरुवात करण्यात आल्याने यावर्षी नालेसफाई अधिक चांगल्या पद्धतीने होणार असल्याचा दावा पालिकेकडून करण्यात आला आहे. मात्र, पावसाळा सुरु झाला तरी अनेक ठिकाणी नाल्यातून बाहेर काढण्यात आलेला गाळ अजूनही नाल्याच्या काठावरच पडून असून, पावसाच्या पाण्यासोबत हा गाळ पुन्हा नाल्यात जाण्याची शक्यता असल्याने पालिकेची ही नालेसफाई कुचकामी ठरण्याची शक्यता आहे.

पावसाळ्यापूर्वी नाळेसफाईचे काम केल्यावर नाल्यामधून काढण्यात आलेला गाळ त्वरित उचलून नेणे आवश्यक आहे. महापालिकेतर्फे तसे आदेश कंत्राटदारांना देण्यात आले आहेत. कंत्राटदार मात्र पालिकेच्या नियमांना बगल देत असल्याचे पाहायला मिळत आहे. कळंबोली वसाहतीमधील नाल्यामधून काही दिवसांपूर्वी गाळ बाहेर काढण्यात आला आहे. मात्र, तो अद्याप उचलण्यात आलेला नसल्याने पावसाच्या पाण्यासोबत हा गाळ पुन्हा नाल्यात वाहून जाण्याची भीती असून, नालेसफाईसाठी पालिका प्रशासनाकडून करण्यात आलेला करोडो रुपयांचा खर्च वाया जाण्याची शक्यता आहे. त्याचसोबत रस्त्यावर पडलेल्या या ओल्या गाळामुळे दुर्गंधी पसरत असून, नागिरकांना त्याचाही त्रास सहन करावा लागत आहे. त्याचप्रमाणे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्नदेखील निर्माण होण्याची शक्यता आहे.

Exit mobile version